Rahul Rekhawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Collector : 'कलेक्टर साब को गुस्सा क्याें आता'; रेखावारांमुळे मुख्यमंत्री शिंदेही गेटबाहेर, नेमकं काय झालं ?

Rahul Rekhawar : कोल्हापुरात एकतर्फी कारभार रेटण्याचे प्रकार वाढले

Rahul Gadkar

Kolhapur Political News : कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे वादग्रस्त कारभारामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. आडमुठे धोरण राबवणे, सततची चिडचिड आणि यावर बोट ठेवले की, पत्रकारांचाही अपमान करणे असे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. परिणामी जिल्हाधिकारी रेखावार नागरिकांच्या असंतोषाचे कारण बनत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या वागण्यामुळे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुर्ची सोडून गेटबाहेर आले होते. (Latest Political News)

आता या वादग्रस्त जिल्हाधिकाऱ्यांची बदली व्हावी, यासाठी कोल्हापुरातून आवाज उठत आहे. मराठा समाजाबद्दल केलेले वक्तव्य हे नागरिकांच्या रोषांचे प्रमुख कारण होते. यानंतरही ते पुन्ह-पुन्हा एकतर्फी कारभार रेटण्याचा प्रकार करतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांबाबत जनमाणसांत असंतोष निर्माण होत आहे.

रेखावार यांची वादग्रस्त कारकीर्द

  • सर्किट हाऊसच्या दालनात शुक्रवारी बैठक पार पडली. आपण दोन्ही बाजू ऐकून घेऊन पत्रकारांना मंदिरात प्रवेश देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, आपण आदेश देऊनही त्या विषयावर 'कॉम्प्रमाइज' करणार नाही असे विधान त्यांनी केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आदेश देऊनही त्यांनी 'नो कॉम्प्रमाइज' असे वक्तव्य केले. एक प्रकारे पालकमंत्र्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी रेखावार यांनी केला होता. (Maharashtra Political News)

  • दोन महिन्यांपूर्वीच कोल्हापूरच्या जनतेला रेडिओमार्फत पुराची भीती घालून संपूर्ण कोल्हापूर शहराला वेठीस धरले होते. कोल्हापूर शहर आणि परिसरात पूरस्थिती नसतानाही अनेक गावांना स्थलांतरित होण्यास भाग पाडले होते. त्याचा फटका स्थानिकांना बसला होता. नागरिकांची हेळसांड झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांवर टीकेचे झोड उठली होती.

  • उपमुख्यमंत्री अजित पवार हे 15 ऑगस्टनिमित्त कोल्हापुरात आले होते. त्यावेळी मराठा समाजासोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी रेखावार यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्यास मोठा वाद निर्माण होईल, असे वक्तव्य केले होते. उपमुख्यमंत्री पवारांना चुकीची माहिती देऊन दोन समाजात संभ्रम निर्माण केल्याचा मराठा संघटनांचा आरोप रेखावार यांच्यावर आहे. याबाबत त्यांना माफी मागावी लागली होती.

  • कोल्हापूर शहरात ७ जून रोजी दंगल उसळली होती. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाता करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी उशिरा धाव घेतली होती. त्यामुळे दंगलीकडेही रेखावार यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

  • एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांना जिल्हाधिकारी रेखावार यांनी 'तुम्ही बाहेर थांबला तरी चालेल', असे बोलले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी गेटबाहेर येऊन माध्यमांशी संपर्क साधत पत्रकार परिषद घेतली होती.

  • जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांत त्यांच्या कारकीर्दीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवली होती. त्याचे निवेदन भाजपचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी रेखावार यांना देणार होते. त्यावेळी माध्यमांच्या फोटोग्राफर यांचा पोलिसांकरवी कॅमेरा काढून घेण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

  • दोन वर्षांपूर्वी माहितीच्या अधिकारावरून बातमी छापल्यानंतर संबंधित प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हाॅट्सअॅप ग्रुपवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्वांसमोर वाद घातला. वादग्रस्त चॅटिंग करत संबंधित पत्रकाराला कायदेशीर नोटीस पाठवण्याची धमकीवजा मेसेज करून स्वतः रेखावर ग्रुपमधून 'लेफ्ट' झाले.

दीपक केसरकर यांची मध्यस्थी

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावाल हे सातत्याने नागरिकांच्या आणि माध्यम प्रतिनिधींच्या टीकेचे धनी ठरत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे वैतागलेल्या नागरिकांनी आणि माध्यम प्रतिनिधींनी थेट तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन त्यांची बदलीची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी दीपक केसरकर यांनी रेखावार यांना समज देऊन या प्रकरणावर पडदा टाकला होता.

प्रेस क्लबचे पालकमंत्र्यांना निवेदन

जिल्हाधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही न्याय मागणे कठीण झाले आहे. रेखावार हे जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आहेत, की कोल्हापूरकरांना त्रास देण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी यांची वर्तवणूक अशीच राहणार असेल, तर शासनाच्या आगामी दसरा महोत्सवावर कोल्हापुरातील माध्यमातील पत्रकारांनी का बहिष्कार टाकू नये, असा प्रश्न उपस्थित करत कोल्हापूर प्रेस क्लबने पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT