Sahaji patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

उसाची १५० एकर शेती विकली; पण पट्ठ्या शेवटी आमदार झालाच! : शहाजीबापूंच्या संवादावर प्रतिक्रियांचा पाऊस

ही सोशल मीडियातून व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप जाणूनबुजून केलेली असावी. नव्या राजकीय समीकरणांमध्ये आपल्याला काहींची कृपादृष्टी मिळावी, यासाठीच हा सर्व खटाटोप असल्याचे प्रतिक्रियांमधून प्रतीत होत आहे.

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (जि. सोलापूर) : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये हाय...' हे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांचे गुवाहाटीवरून केलेले मोबाईल संभाषण सोशल मीडियावर मोठा चर्चेचा विषय झाला. या ऑडिओ क्लिपवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात मिम्सचा पाऊस पडू लागला आहे. काही कडवट, काही प्रेमळ तर काही आत्मचिंतन कराव्यात, अशाच मिम्स सोशल मीडियातून येऊ लागल्याने हा देखील एक चर्चेचा विषय झाला आहे. त्यातील ‘दीडशे एकर उसाची शेती विकली, पण पट्ठ्या शेवटी आमदार झालाच. यालाच म्हणतात नाद केला; पण वाया नाय गेला...’ अशी एक राजकारणाचे वास्तव दाखवणारी प्रतिक्रिया आहे. (Rain of reactions on MLA Shahaji Patil's dialogue)

सध्या महाराष्ट्रातील नाराजीच्या राजकीय नाट्यामुळे मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन तब्बल ४० पेक्षा जास्त आमदारांना घेऊन गुवाहटीमध्ये गेले आहेत. या बंडखोर आमदारांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे सांगोल्याचे एकमेव आमदार शहाजी पाटील यांचा समावेश आहे. पहिले दोन-तीन दिवस नॉट रिचेबल राहिल्यानंतर आमदार शहाजी पाटील आणि सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष, पाटलांचे निकटवर्तीय रफिक नदाफ यांचा मोबाईलवरील संवाद सोशल मीडियातून व्हायरल झाला. हा संवाद जसा व्हायरल झाला, तसा सोशल मीडियातून यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहे.

सोशल मीडियातील काही निवडक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे

  • काय झाडी..., काय डोंगार..., काय हाटील.. सांगोल्यातील दुष्काळवर लक्ष असू द्या आमदार पाटील..

  • दीडशे एकर उसाची शेती विकली, पण पट्ठ्या शेवटी आमदार झालाच. यालाच म्हणतात नाद केला; पण वाया नाय गेला...

  • महाराष्ट्रात जर फिरले असते तर त्यापेक्षा जास्त झाडाझुडपांनी नटलेले डोंगर आणि त्यात सर्वसुखसोईंनी बांधलेले हॉटेल पाहिले असते...पण फुकटात भेटणाऱ्या गोष्टींची मज्जा काही वेगळीच.

  • गुजरात टुरिझम- कुछ दिन तो गुजारो गुजरातमें

  • मध्यप्रदेश टुरिझम- हिंदुस्तान का दिल देखो

  • ओडिशा टुरिझम- इंडियाज बेस्ट केप्ट सिक्रेट

  • आसाम टुरिझम- काय ती झाडी, काय ती‌ डोंगार, काय ती हाटिल..

  • ठरवून रेकॉर्ड केलंय...आणि तालुक्याची सहानुभूति मिळावी; म्हणून गणपतआबांचे नाव जाणूनबुजून वारंवार घेतलं जातंय...!

ही सोशल मीडियातून व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप जाणूनबुजून केलेली असावी. नव्या राजकीय समीकरणांमध्ये आपल्याला काहींची कृपादृष्टी मिळावी, यासाठीच हा सर्व खटाटोप असल्याचे प्रतिक्रियांमधून प्रतीत होत आहे. अनेक व्हिडिओ गाण्यांबरोबरच त्यांचा संवाद जोडून वेगळ्या प्रतिक्रियाही नोंदवल्या जात आहेत.

अनेकदा रोषालाही सामोरे जावे लागले आहे

विद्यार्थिदशेपासूनच शहाजी पाटील हे फर्डे वक्ते म्हणूनच ओळखले जातात. निवडणुकांमध्ये त्यांच्या सभांना मोठी गर्दी पाहावयास मिळते. परंतु याच वक्तृत्वामुळे त्यांना अनेकवेळा रोषालाही सामोरे जावे लागले आहे. सध्या नाराज नाट्याचे महाभारत सुरू असतानाच त्यांचा गुवाहाटीवरून झालेला  संवादही तसाच सोशल मीडियावर मोठा चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे शहाजी पाटलांच्या बोलण्याने ते जेवढे लोकप्रिय झाले आहेत, तेवढेच त्यांच्या अशा अनेक प्रतिक्रियांमुळे राजकीय रोषालाही त्यांना सामना करावा लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT