Satara, 19 April : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी झालेला अभूतपूर्व गोंधळ आणि शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी भाजपसोबत घेतलेली भूमिका या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या (ता. 20 एप्रिल) कोरेगाव आणि साताऱ्यात येत आहेत. या दौऱ्यात कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. बर्गे यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे आमदार शिंदे यांना पर्याय देण्याची चाचपणी मानली जात आहे. तसेच, सातारा शहरात सभा घेऊन बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना इशारा दिला जात असल्याचे मानले जात आहे.
उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उद्या (ता. 20 एप्रिल) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ते कोरेगाव तालुक्यातील अंगापूर येथे दाखल होणार आहेत. चारच्या सुमारास प्रसिद्ध श्री आत्म गजानन मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर अंगापूर व पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर शरद कणसे यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत.
अंगापूर येथील कार्यक्रमानंतर सोमवारी सायंकाळी सहा वाजता सातारच्या शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या (Shivsena) पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीत पक्ष संघटन विस्तार, आगामी राजकीय धोरणे आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बळकटीवर चर्चा करण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे हे सातारा येथील गांधी मैदानावर सायंकाळी सात वाजता जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत कोरेगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत ऊर्फ राजाभाऊ बर्गे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. बर्गे यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेला दिलेले उत्तर मानले जात आहे. झेडपी निवडणुकीतील घडामोडीनंतर शिंदे यांचा हा दौरा विशेष मानला जात आहे.
या सभेत शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या १५ जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सत्काराला आमदार महेश शिंदे यांच्या गटाचे दोन सदस्य उपस्थित राहणार का, अशी चर्चा रंगली आहे. तसेच खुद्द पक्षाचे प्रमुख कोरेगावात येत असताना महेश शिंदे मात्र अनुपस्थित राहण्याची शक्यता अधिक आहे. कारण ते स्वतः मुंबईत एका दवाखान्यात ॲडमिट आहेत, त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यात आमदार महेश शिंदे समर्थकांचा सहभाग असणार का, याची चर्चा सुरू आहे.
आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलणार का, हाही प्रश्न आहे. कारण ते आपूसकच भाजपच्या गोटात जाण्याचा धोका आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी होण्याची संधी असताना ती हुकल्याने भाजपवरही त्यांना बोलावे लागणार आहे, त्यामुळे शिंदेंच्या भाषणाकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.
चर्चेनंतर शिवसेना प्रवेशाचा निर्णय : राजाभाऊ बर्गे
शिवसेना प्रवेशाबाबत राजाभाऊ बर्गे म्हणाले, "आपण पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभी दरे येथे जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्यासमवेत एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विविध विकासकामांवर चर्चा केली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशीही चर्चा झाली असून, त्यांनीही कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आश्वासन दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.