Rajan Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohol Politic's : अपर तहसीलचा अट्टहास नडला अन्‌ मोदी लाटेसह 30 वर्षांपासून अभेद्य राखलेला आमदारकीचा गड ढासळला

Angar Upper Tehsil office : मोहोळच्या राजकारणाचा चिरेबंदी वाडा अनगरच्या पाटलांच्या नावावर होता. मात्र, पाटलांना अतिमहत्वकांक्षा नडली. तहसील कार्यालयही आपल्याच गावात हवे, हा अट्ठाहास अनगरच्या पाटलांना महागात पडला

Vijaykumar Dudhale

Solapur, 18 February : माजी आमदार राजन पाटील आणि मोहोळची आमदारकी हे गेल्या काही वर्षांतील राजकीय समीकरण बनलं होतं. त्याला अगदी मोदी लाटही धक्का देऊ शकली नव्हती. मोहोळच्या राजकारणाचा चिरेबंदी वाडा अनगरच्या पाटलांच्या नावावर होता. मात्र, पाटलांना अतिमहत्वकांक्षा नडली.

अपर तहसील कार्यालयही (Angar Upper Tehsil office) आपल्याच गावात हवे, हा अट्ठाहास अनगरच्या पाटलांना महागात पडला आणि तब्बल ३० वर्षे हातात असलेली आणि याही वेळी ती ताब्यात राहण्यासारखी परिस्थिती असताना अपर तहसील कार्यालयामुळे घात झाला. पाटलांच्या हातून ३० वर्षांनंतर मोहोळची आमदारकी निसटली आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अनगर अपर तहसील कार्यालयही रद्द झाले. त्यामुळे पाटलांच्या ताब्यातील आमदारकीही गेली आणि अपर तहसील कार्यालयही गेले.

विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर मोहोळची राजकीय हवा माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि तत्कालीन आमदार यशवंत माने यांच्या बाजूने वाहत होती. मात्र, अनगर अपर तहसील कार्यालयाचा अध्यादेश राज्य सरकाने काढताचा राजकीय हवा बदलण्यास सुरुवात झाली. यशवंत माने यांच्या माध्यमातून आलेला निधी, त्यातून झालेली रस्त्याचे कामे, सर्वसामान्यांना थेट मोबाईलवर उपलब्ध होणारा आमदार यामुळे यशवंत माने म्हणजेच राजन पाटील गटाचा उमेदवार निवडून येईल, अशी परिस्थिती होती.

अनगर अपर तहसील कार्यालयाचा अध्यादेश निघाल्यानंतर तालुक्यातील राजन पाटील विरोधक एकत्र येण्यास सुरुवात झाली. त्याला उमेश पाटील आणि राजन पाटील या वादाची किनार होती. उमेश पाटील यांनी अनगर अपर तहसील कार्यालयावरून संपूर्ण मतदारसंघात रान पेटवायला सुरुवात केली. त्यामुळे यशवंत माने आणि उमेश पाटील यांच्यात नळावरील भांडणासारखे भांडण झाले.

अनगर अपर तहसील कार्यालयाच्या विरोधात मोहोळ तालुका संघर्ष बचाव समितीच्या झेंड्याखाली तालुक्यातील राजन पाटील विरोधक कधी नाही ते एकत्र आले. सर्वांनी एकास एक उमेदवार देण्याच्या आणाभाका घेतल्या. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून रमेश कदम यांच्या मुलीला सिद्धीला विधानसभेची उमेदवारी जाहीर होताच संजय क्षीरसागर यांनी बंडखोरी केली, त्यामुळे विरोधकांमध्ये पुन्हा फूट पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी कधी नाही ती ऐकी दाखवून शरद पवार यांना मोहोळचा उमेदवार बदलायला लावला. राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे अखेरच्या क्षणी संजय क्षीरसागर यांनी माघार घेत खरे यांना पाठिंबा जाहीर केला आणि मोहोळ विधानसभेचे चित्र पूर्णपणे बदलले. त्याची झलक जयंत पाटील यांच्या मोहोळमधील सभेत दिसून आली होती.

मोहोळमधील आपला उमेदवार धोक्यात आल्याची चाहूल लागल्याने अनगरचे पाटील कधी नाही इतके शेवटच्या क्षणी पळाले. सर्व ताकद पणाला लावली. मात्र, अनगर अपर तहसील कार्यालयामुळे मोहोळ तालुक्यात पाटलांच्या विरोधात विरोधकांनी रान तापवले होते. त्यामुळे पाटलांची अखेर पळापळ उपयोगी येऊ शकली नाही.

मोदी लाटेत २०१४ मध्येही मोहोळ राष्ट्रवादीचा पर्यायाने राजन पाटील यांचा गड कायम होता. मात्र, अनगर अपर तहसील कार्यालयाच्या अट्टाहासामुळे अगदी आवक्यात असलेली आमदारकी हातची गेली. अपर तहसील कार्यालयाच्या अगोदर दुय्यम निबंधक कार्यालयही अनगरमध्ये नेण्यात आले होते. त्याचेही भांडवल विरोधकांकडून करण्यात आले. त्यामुळे अपर तहसील कार्यालय जाहीर होण्याआधी हातात असलेली मोहोळची आमदारकी राजन पाटील यांच्या हातातून निसटली, हे वास्तव आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT