Angar Upper Tehsil Office Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajan Patil : राजन पाटील सर्वपक्षीयांना ठरले भारी; विरोधानंतरही अनगर अप्पर तहसील सुरू करून दाखवले!

Vijaykumar Dudhale

Solapur, 14 September : मोहोळमधील सर्वपक्षीय नेत्यांचा तीव्र विरोध मोडीत काढत अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात माजी आमदार राजन पाटील यांनी यश मिळविले आहे. अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या कामकाजाला शुक्रवारी दुपारनंतर सुरुवात झाली. विशेष म्हणजे अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीची उच्च न्यायालयात याचिका दाखल असतानाही सरकारनेही हे कार्यालय सुरू करण्याचे धाडस दाखवले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या (Angar Upper Tehsil Office ) तसीलदारपदाचा अतिरिक्त कार्यभार हा मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडे, तर नायब तहसीलदारपदाचा कार्यभार मोहोळचे नायब तहसीलदार प्रवीणकुमार वराडे यांच्याकडे देण्यात आलेला आहे.

दळणवळणाच्या सुविधांचे कारण सांगून अनगर (Angar) अप्पर तहसील कार्यालयातून पेनूर, पाटकूल आणि तांबोळे ही तीन गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ती गावे वगळून उर्वरित चाळीस गावांसाठी अनगरचे अप्पर तहसील कार्यालय सेवा देणार आहे.

अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून मोहोळच्या राजकारणात मोठा आगडोंब उसळला होता. मोहोळपासून जवळच असलेल्या अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले होते. त्याला मोहोळ तालुक्यातील बहुतांश राजकीय नेत्यांनी विरोध केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि राजन पाटील (Rajan Patil) यांचे पक्षांतर्गत विरोधक उमेश पाटील यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून माजी आमदार पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते.

मोहोळमध्ये सर्वपक्षीय बंद करून माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले होते. त्यानंतर सर्वपक्षीय नेतेमंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले होते, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले होते. मात्र, राजन पाटील यांनी आपली ताकद लावून पुन्हा एकदा हे अपर तहसील कार्यालय अनगर येथे सुरू केले आहे.

राजन पाटील यांच्या विरोधातील सर्वपक्षीय नेत्यांनी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून न्यायालयीन लढा देण्याचाही निर्णय घेतला होता. या संघर्ष समितीच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, तसेच राजन पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक असलेले उमेश पाटील यांनी अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्यावरून पक्षाच्या आमदाराच्या विरोधात भूमिका घेतली होती.

अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्यावरून आमदार यशवंत माने आणि उमेश पाटील यांच्या तू तू मै मै झाली होती. अगदी विधानसभा निवडणुकीत मी यशवंत माने यांचा प्रचार करणार नाही, असेही उमेश पाटील यांनी जाहीर केले होते, तर माझा प्रचार करा, असे मी उमेश पाटील यांना सांगणारच नाही. त्यांच्यामुळे माझे काही बिघडत नाही, असे उत्तर आमदार यशवंत माने यांनी दिले होते.

मोहोळ तालुक्यात विरोध असतानाही माजी आमदार राजन पाटील यांनी आपले राजकीय वजन वापरत अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यश मिळविले आहे. आगामी काळात त्याचे काय पडसाद उमटतात, हे पाहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT