Rajan Patil
Rajan Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच असतात पोरं, त्याचा आम्हाला स्वाभिमान : राजन पाटलांचे वादग्रस्त विधान

विश्वभूषण लिमये

सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याचा (Bhima Sugar Factory) प्रचार आरोप-प्रत्यारोपांनी प्रचंड गाजला. प्रचाराचा शेवटचा दिवस तर वादग्रस्त विधानाने गाजला. भीमा कारखान्याचे अध्यक्ष आणि खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यावर टीका करताना मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी वादग्रस्त विधान केले. विशेष म्हणजे त्या गोष्टीचे पाटील यांनी समर्थन केले आहे. (Rajan Patil's Controversial Statement in Bhima Sugar Factory Election)

भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की, गेली आठ दिवसांपासून फक्त आमच्या कुटुंबीयांवर टीका केली जात आहे. दुसरी काही भानगडच नाही. प्रशांतमालक (परिचारक) तुम्ही आज आला आहात. निवडणूक भीमा कारखान्याची आहे की राजन पाटील यांच्या कुटुंबीयांची आहे, हे कळायला मार्गच नाही. आमच्या पोरांना बाळं म्हणत आहेत. अरं आम्ही पाटील आहोत. त्यांना माहितीच नाही की, पाटलांच्या पोरांनाही लग्नाच्या आधी एवढी बाळं असतात बेट्या....तुझ्याएवढी आणि त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे.

आमच्या पोरांना बाळं म्हणत आहेत. तुम्ही आमच्या पोरांना भीती घालताय? अहो, वयाच्या सतराव्या वर्षी ३०२ ची कलमं भोगणारी आमची पोरं आहेत. तुम्ही आम्हाला काय भीती घालताय, असा सवालही माजी आमदार राजन पाटील यांनी सभेतून उपस्थित केला.

राजन पाटील यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याने असे बेताल वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. एकंदरीतच भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराचा पातळी प्रचंड घसरली होती. कारखान्याचे धोरण, ऊसदर, एफआरपी यावर बोलण्याऐवजी दोन्ही पॅनेलकडून वैयक्तीक टिका-टिप्पणीला जोर आला होता.

भीमा कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्येही फूट पडली होती. कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभेची गणिते आखले जात होती. शिवाय काही जुने हिशेबही या निवडणुकीत चुकते करण्याचा प्रयत्न होताना दिसला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT