Rajan Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohol Politics : राजन पाटलांची विरोधकांना दुसऱ्यांदा धोबीपछाड; अप्पर तहसीलनंतर महामंडळ अध्यक्षपदाची लॉटरी

Rajan Patil President of State Cooperative Council : अनगर अप्पर तहसील कार्यालयाला प्रचंड विरोध होऊनही ते पाटील यांनी गेल्या आठवड्यातच अनगरमध्ये सुरू करून दाखवले. त्यानंतर आता राजन पाटील यांनी थेट मंत्रिपदाला गवसणी घालत राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे राजकीय वजनही चांगलेच वाढले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 27 September : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी पक्षांतर्गत विरोधकांसह तालुक्यातील इतर पक्षांमधील विरोधकांना दुसऱ्यांदा धोबीपछाड दिली आहे. अनगर अप्पर तहसील कार्यालयाला प्रचंड विरोध होऊनही ते पाटील यांनी गेल्या आठवड्यातच अनगरमध्ये सुरू करून दाखवले. त्यानंतर आता राजन पाटील यांनी थेट मंत्रिपदाला गवसणी घालत राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे राजकीय वजनही चांगलेच वाढले आहे. या वाढलेल्या राजकीय वजनाचा आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे.

अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांच्या विरोधात रान उठविण्यात आले होते. तालुक्यातील सर्व विरोधकांनी एकत्र येत पाटील आणि माने यांना घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, सर्वपक्षीय विरोधक एकत्र येऊनही राजन पाटील यांनी अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यश मिळविले आहे.

अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून स्वपक्षातील उमेश पाटील (Umesh Patil) यांनी राजन पाटील यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. राजन पाटील यांना टीकेचे लक्ष्य करताना उमेश पाटील यांची विद्यमान अमदार यशवंत माने यांच्याशी जोरदार तू तू मै मै झाली होती. हे भांडण अगदी एकेरीवर आले होते. मात्र, पाटील आणि माने जोडगळीने संपूर्ण ताकद पणाला लावत अप्पर तहसील कार्यालय सुरू करून दाखवले.

जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने मोहोळमध्ये आलेल्या पक्षश्रेष्ठींसमोर आमदार यशवंत माने यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. त्यानंतर त्याच सभेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही जागा दाखवण्याची भाषा नाव न घेता उमेश पाटील यांना केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडवट शब्दांत पाटील यांचा समाचार घेतला होता, त्यावेळीच राष्ट्रवादीचे नवे पक्षश्रेष्ठी राजन पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार, हे स्पष्ट झाले होते.

अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या यशानंतर आठवडाभरातच राजन पाटील यांची राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पाटील यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला असून लाल दिव्याचे पाटील यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजन पाटील यांना मिळालेल्या पदाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पर्यायाने महायुतीच्या उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता आहे.

विरोधकांची ऐकी डोकेदुखी ठरणार

राजन पाटील यांनी अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यश मिळविले असले तरी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून एकवटलेले विरोधक हे राष्ट्रवादीपुढील आव्हान असणार आहे. एकास एक उमेदवार रिंगणात उतरला तर तुल्यबळ लढत पहायला मिळू शकते. मात्र, विरोधकांमध्ये फूट पडली तर त्याचा फायदा राजन पाटील पर्यायाने राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांना होऊ शकतो, त्यामुळे विरोधकांची ऐकी हे पाटील यांच्यासमोरील डोकेदुखी होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT