Rajendra Nagawade
Rajendra Nagawade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राजेंद्र नागवडेंनी मारला मास्टर स्ट्रोक

संजय आ. काटे

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) : श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काल ( शनिवारी ) झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे ( Congress ) ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) यांनी भाजप ( BJP ) आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्या पॅनेलचा पराभव करत वर्चस्व राखले. नागवडे व कुकडी या दोन साखर कारखान्यांतील निवडणुका श्रीगोंदे तालुक्यातील आगामी निवडणुकांतील राजकारणाची नोंदी ठरू शकणाऱ्या आहेत. Rajendra Nagwade struck a master stroke

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अखेर सत्ताधारी राजेंद्र नागवडे यांच्या गटाने सफाईदार विजय मिळवीत, 'कहो दिलसे, राजूदादा फिरसे' हेच विरोधकांना दाखवून दिले. आमदार बबनराव पाचपुते व केशवराव मगर यांच्या गटाला एकहाती अस्मान दाखवीत राजेंद्र नागवडे यांनी मास्टर स्ट्रोक मारला. शिवाजीराव नागवडे यांची पुण्याई मुलाच्या कामी आली. विरोधकांना अतिआत्मविश्वास नडला. नागवडे गटाने एकीने राबविलेल्या यंत्रणेमुळे विजयश्री मिळाली.

आमदार पाचपुते व केशवराव मगर यांच्या गटाचे मोठे आव्हान नागवडे यांच्यासमोर उभे राहिल्याचे भासविले जात होते. त्यातच बापूंच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक टोकाची होऊ, नये अशी सामान्यांची इच्छा होती. मात्र, राजेंद्र नागवडे यांच्या कारभारावर खरपूस टीका करीत पाचपुते-मगर व त्यांच्या समर्थकांनी कारखाना तेच जिंकणार अशी हवा केली होती.

कालच्या मतदानानंतर विरोधकांची हवा गुल होणार असल्याचे लक्षात आले होते. आज निकालाच्या सुरवातीपासून नागवडे गटाला अडीच हजारांचे मताधिक्य मिळत असल्याचे चित्र होते. सायंकाळी उशिरापर्यंत आलेल्या चार फेऱ्यांच्या निकालात सगळ्या, म्हणजे चौदा जागा जिंकत नागवडे गटाने क्लीन-स्विपच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली होती. मध्यरात्रीपर्यंत मतमोजणी पूर्ण झाली अनं अनुराधा नागवडे यांचे 21 पैकी 21 जागांचे भाकीत खरे ठरले.

विरोधकांनी मोठेपणा दाखवीत बापूंना आदरांजली म्हणून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक होते. मात्र, तसे न होता कारखान्यातून बापूंच्या वारसदारांनाच हटविण्याचे राजकारण झाले. राजेंद्र नागवडे यांच्या विरोधात सगळ्याच विरोधकांनी एकी करीत त्यांना एकटे पाडण्याचा केलेला प्रयत्न सभासदांना रुचला नसल्याचे निकालात पुढे आले.

राजेंद्र नागवडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत त्यांच्या संपत्तीचे जाहीर आकडे सांगणे सभासदांच्या पचनी पडले नाहीत. उसाला दर मिळतो, वेळेवर पेमेंट होते, बाकी अडचणी नाहीत, असा विचार करीत सभासद नागवडे यांच्या पाठीशी राहिले. विरोधकांनी सोशल मीडियाला प्रचाराचे मुख्य केंद्र मानले. मात्र, नागवडे गट थेट सभासदांच्या संपर्कात राहून त्यांचा कारभार दाखवून देत होता. ही त्यांची जमेची बाजू ठरली. बापूंवरचा लोकांना विश्वास किती दृढ आहे, याचा प्रत्यय पुन्हा आला.सदाशिव पाचपुते यांची उणीव जाणवली

विरोधी गटाला सदाशिव पाचपुते यांच्या निधनाने मोठी उणीव जाणवली. त्यांची प्रचाराची पद्धत पाचपुते गटात यावेळी दिसलीच नाही. त्यातच सदाशिव पाचपुते यांना मानणारे अनेक कार्यकर्ते नागवडे यांच्या गटात दिसत होते. नागवडे यांच्या विजयात पडद्यामागून हललेली सूत्रेही महत्त्वाची ठरल्याचे बोलले जाते.

दीपकशेठ ठरले किंगमेकर

शिवाजीराव नागवडे यांचे पुत्र दीपक यांनी या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बंधू राजेंद्रदादांना विरोधकांनी एकटे पाडल्याचे लक्षात येताच, एरवी राजकारणापासून अलिप्त राहणाऱ्या दीपकशेठ यांनी सगळी जबाबदारी खांद्यावर घेत मैदानात उडी घेतली. प्रत्येक मतदारापर्यंत जात नागवडे कुटुंबाची त्यांच्याशी असलेली बांधिलकी पटवून दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT