Rajendra Raut -Manoj Jarange Patil-Rajan Jadhav Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : ‘जरांगेंना शह देण्यासाठीच फडणवीसांची सुपारी घेऊन राजेंद्र राऊतांचे बार्शीत आंदोलन’

Rajendra Raut Vs Manoj Jarange Patil : जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले आहे, त्यांच्या पाठीशी सर्व महाराष्ट्र उभा आहे. बार्शीतील मोजकेच लोक त्या आंदोलनाला उपस्थित होते. ज्यांना राऊत यांनी कॉन्ट्रॅक्ट दिली आहेत. अशीच लोकं त्या ठिकाणी होते.

Vijaykumar Dudhale

Solapur, 15 sptember : राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुपारी घेऊन आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना शह देण्यासाठी बार्शीत वेगळे आंदोलन केले आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात, तसेच अंतरवाली सराटीतील लाठीहल्ल्याच्या निषेधासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी तोंड का उघडले नव्हते, असा खडा सवाल सकल मराठा समाजाचे समन्वयक राजन जाधव यांनी केला.

मराठा आरक्षण आंदेालक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या विरोधात बोलणारे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा आज सोलापूरमध्ये निषेध करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राजन जाधव यांनी राजेंद्र राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.

मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले आहे, त्यांच्या पाठीशी सर्व महाराष्ट्र उभा आहे. बार्शीतील मोजकेच लोक त्या आंदोलनाला उपस्थित होते. ज्यांना राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी ठेके दिले आहेत. अशीच लोकं त्या ठिकाणी होते. मनोज जरांगे पाटील यांना विरोध करायाला या लोकांना लाज वाटली पाहिजे, अशी टीकाही जाधव यांनी केली.

जाधव म्हणाले, राजेंद्र राऊत यांनी मराठा महासंघासाठी कधीही रक्त सांडलेलं नाही. त्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी रक्त सांडलं असेल. समाजासाठी त्यांनी काहीही केलेले नाही. राजेंद्र राऊत यांनी मराठा महासंघाचे कधीही काम केलेले नाही. ते खोटं बोलत आहेत. मराठा समाजाच्या जीवावरच राजेंद्र राऊत हे आमदार झाले आहेत, तरीही ते मराठा समाजाच्या विरोधात बोलत आहेत.

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते, त्या वेळी राजेंद्र राऊत यांचे तोंड का उघडले नव्हते. मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांवर अंतरवाली सराटीमध्ये लाठीहल्ला करण्यात आला होता. त्या वेळी राजेंद्र राऊत यांनी तोंड का उघडलं नव्हतं, असा खडा सवालही त्यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एसआयटी चौकशी लागू करण्यात आली होती. त्या वेळी तुम्ही का विरोध केला नाही. उलट त्या वेळी तुम्ही टाळ्या वाजत बसला होता. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्याचाही राऊत यांनी निषेध केलेला नाही.

मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे जवळपास 60 ते 70 लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. त्या माध्यमातून दोन ते अडीच कोटी मराठा समाज ओबीसीमध्ये समाविष्ट होत आहे, ते केवळ मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे. त्याचं श्रेय घेण्याच्या भानगडीत कोणी पडू नये, असा इशाराही जाधव यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात राजेंद्र राऊत बोलत असतील तर त्यांच्या विरोधात गावोगावी आणि वाड्या वस्त्यांवर जोडो मारो आंदोलन केले पाहिजे, असे आवाहनही सकल मराठा समाजाचे समन्वयक राजन जाधव यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT