Manoj Jarange Patil-Rajendra Raut- Rahul Narwekar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajendra Raut : जरांगेंसोबतच्या वादानंतर राजेंद्र राऊतांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; केली मोठी मागणी

Rajendra Raut's Letter to Rahul Narvekar : गेली दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राऊत यांनी आव्हान देताच जरांगे पाटील यांनी बार्शीतून भेटायला आलेल्या लोकांसमोर बोलताना राऊत यांना प्रतिआव्हान दिले आहे.

Vijaykumar Dudhale

Barshi, 08 September : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राजेंद्र राऊतांचे आव्हान स्वीकारत बार्शीत येण्याचे प्रतिआव्हान दिले होते. त्यानंतर आमदार राजेंद्र राऊत यांनी तातडीने विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्राद्वारे त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने अधिवेशन बोलविण्याची मागणी केली आहे.

गेली दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राऊत यांनी आव्हान देताच जरांगे पाटील यांनी बार्शीतून भेटायला आलेल्या लोकांसमोर बोलताना राऊत यांना प्रतिआव्हान दिले आहे. तसेच, लवकरच बार्शीत येऊन राजेंद्र राऊतांना प्रत्युत्तर देण्यात येईल, असे जरांगे पाटील यांनी सांगितले होते.

जरांगे पाटील यांच्यासोबत वादानंतर आमदार राजेंद्र राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यात विविध मागण्या पुढे येत आहेत.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी आहे. त्यावरून राजकारणही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या मागणीमुळे मराठा समाज-ओबीसींमध्ये वाद निर्माण होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी तातडीने विशेष अधिवश बोलवावे, अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्राद्वारे केली आहे.

काही जिल्ह्यांत तर ओबीसींना मराठ्यांनी बोलायचे नाही. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे नाही. हॉटेल, पानटपरी, दुकान अशा ठिकाणी एकमेकांच्या दुकानात माल खरेदी करायचे नाही, असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशा प्रकारांमुळे मणिपूरसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते की काय, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, राजकीय पक्ष वेगळी भूमिका घेतात. त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होण्यासाठी प्रत्येक आमदारांनी आपली भूमिका विधान भवनाच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर मांडावी. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे की नाही द्यावे, यावर आपल्या भावना व्यक्त कराव्यात.

ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, असे प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला ओबीसीतून नको, असे सरकारला कळवावे. आपला पक्ष व व्यक्तीशः प्रत्येक आमदारांनी आपली भूमिका राज्यासमोर मांडावी.

राज्यातील सर्व पक्षांच्या प्रमुखांना मी याबाबत पत्र लिहिणार आहे. तसेच, प्रत्यक्षही जाऊन भेटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान चर्चा करून निर्णय घ्यायचे. त्याच पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठा समाज बांधवांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलवावी, अशी मागणी राजेंद्र राऊत यांनी केली.

ते म्हणाले, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळणार की नाही, यासाठी नामवंत वकिलांची फौज उभी करावी. राज्यातील सर्व आम्ही मराठा आमदार वकिलांची फी देऊ. ती बैठक संपूर्ण महाराष्ट्रात लाईव्ह करण्याची जबाबदारीही आम्ही घेऊ.

ते महाविकास आघाडीचे पदाधिकारी

दरम्यान, आंतरवली सराटी येथे बार्शीतून काही वाहने गेली होती, त्याबाबत राऊत म्हणाले, पन्नास वाहने गेली होती, त्यामध्ये सर्व जण महाविकास आघाडीचे पदाधिकारी होते. त्यात कोणीही गरजवंत मराठा नव्हता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT