Rajendra Raut-Jaywantrao Jagtap-Rashmi Bagal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karmala Politic's : राजेंद्र राऊतांची यशस्वी शिष्टाई; करमाळ्यातील पारंपारिक कट्टर विरोधकांना आणले एकत्र!

Jaywantrao Jagtap-Rashmi Bagal Yuti : सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र राऊत यांच्या शिष्टाईमुळे जयवंतराव जगताप आणि रश्मी बागल यांच्यात समेट झाला. जगताप यांनी भाजप व राष्ट्रवादी उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 31 January : सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या शिष्टाईला यश आले आहे. करमाळ्याचे माजी आमदार तथा शिवसेना नेते जयवंतराव जगताप आणि भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांच्यात समेट घडवून आणण्यात राऊत यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी माजी आमदार जगताप यांंनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

करमाळा (Karmala) तालुक्यातील पारंपारिक विरोधक असलेले जगताप व बागल एकत्र आल्याने ही तालुक्याच्या राजकारणातील ही मोठी घडामोड मानली जात आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 2018 च्या सभापती निवडीवेळी बागल व जगताप यांच्यात मोठे भांडण झाले होते. त्यानंतर 2026 च्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन गट एकत्र आले आहेत.

आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा आमदार नारायण पाटील यांना पाठिंबा दिला होता. आमदार पाटील यांच्या विजयात माजी आमदार जयवंतराव जगताप (Jaywantrao Jagtap) यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या प्रचार सभेला आमदार नारायण पाटील उपस्थित न राहिल्याने पाटील व जगताप यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या उपस्थितीत अकलूज येथे बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये ही निवडणूक पक्ष चिन्हावर लढवायची की आघाडी करून यावरून मतभेद झाले.

या बैठकीत जगताप आणि पाटील यांच्यात जागावाटप होऊ शकले नाही, त्यामुळे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी या निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला. जगताप गटाच्या उमेदवारांनी भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यानंतर आमदार पाटील विरोधकांनी जगताप यांच्याशी संपर्क साधून आपल्याला पाठिंबा मिळावा, यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नाला आजच्या बैठकीतून यश आल्याचे दिसून येते आहे.

आमदार नारायण पाटील हे करमाळा तालुका विकास आघाडी करून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे करमाळा तालुक्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले असून आमदार नारायण पाटील यांच्या विरोधात माजी आमदार संजयमामा शिंदे, बागल (भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस) एकत्र लढत आहेत. त्यांच्या या युतीला माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा पाठिंबा मिळाला आहे.

बार्शी येथील बैठकीनंतर जगताप, बागल व शिंदे समर्थकांनी सोशल मीडियातून बैठकीचे फोटो व्हायरल केले आहेत. मोहिते पाटील समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. करमाळ्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT