Karmala, 28 September : मागील २०१९ च्या निवडणुकीत खंबीर साथ देणारे करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप हे आमदार संजय शिंदे यांच्यापासून दुरावलेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या करमाळा दौऱ्याचे निमंत्रण आणि विकास कामांच्या कोनशिलेवर नाव असूनही ते अजितदादांच्या दौऱ्यात अनुपस्थित राहिले.
तसेच, काही दिवसांपूर्वीच जगताप यांनी अजित पवारांची भेट घेतली होती, तरीही ते कार्यक्रपासून दूर राहिलेले जयवंतराव जगतापांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काय भूमिका असणार, याची उत्सुकता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार जयवंतराव जगताप (Jaywantrao Jagtap) यांच्या राजकीय भूमिकेविषयी उत्कंठा वाढली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेची निवडणूक स्वतः लढविणार की पुन्हा एकदा आमदार संजय शिंदे यांना पाठिंबा देणार. तसेच मागील काही दिवसांपासून मोहिते पाटलांशी त्यांचे जुळालेले सूर पाहता माजी आमदार नारायण पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार, या विषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
करमाळ्यातून संजय शिंदे (Sanjay Shinde) यांना आमदार करण्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भूमिका कमालीची महत्वाची ठरली आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संजय शिंदे हे आमदार होऊ शकले, हे उघड सत्य आहे. आमदार संजय शिंदे आणि माजी आमदार जयवंतराव जगताप हे 2019 पासून एकत्र काम करत आहेत.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामुळे करमाळा बाजार समितीची गेल्या वर्षी झालेली निवडणूक बिनविरोध झाली होती. त्या मदतीची परतफेड करण्यासाठी त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण जगताप गटाने धैर्यशील मोहिते पाटील यांचे काम केले होते.
गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता जगताप यांची मोहिते पाटील आणि माजी आमदार नारायण पाटील यांच्याशी जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे.
जयवंतराव जगताप यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘देवगिरी' या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. त्या दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली होती. त्यानंतर करमाळ्यात झालेल्या अजित पवार यांच्या दौऱ्यात जयवंतराव जगताप यांनी दांडी मारली होती.
विशेष म्हणजे अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमपत्रिकेवर तसेच कोनशिलेवर जयवंतराव जगताप यांचे नाव होते. त्यानंतरही जगताप हे अजितदादांच्या दौऱ्याकडे फिरकले नव्हते.
दरम्यान, जयवंतराव जगताप यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते करमाळ्यातून विधानसभा निवडणूक लढविणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. तसेच, तालुक्यातील एका कार्यक्रमात त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छूक असून संजय शिंदे आणि नारायण पाटील या दोघांनी माझ्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले होते. त्यामुळे जगतपांची नेमकी भूमिका काय असणार, याची उत्सुकता वाढली आहे.
अजितदादा आपले जुने मित्र : जयवंतराव जगताप
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपले जुने सहकारी आहेत. तसेच, अर्थमंत्री असल्याने विकास कामांच्या निमित्ताने मी त्यांची भेट घेतली हेाती. करमाळ्यात झालेल्या भूमिपूजन आणि उदघाटन कार्यक्रमाचे मला निमंत्रण होते. तसेच, आमदार संजय शिंदे यांनीही फोन करून निमंत्रण दिले होते. मात्र, मी बाहेरगावी असल्याने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नव्हतो, असे स्पष्टीकरण माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.