Rajesh Kshirsagar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नाराज क्षीरसागरांची मेळाव्याला दांडी अन् 24 तासांतच मातोश्रीवर हजेरी

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीवरून काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेत (Shivsena) वाद निर्माण झाला आहे. ही जागा काँग्रेसला सोडल्याने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) हे नाराज होते. दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले क्षीरसागर हे काल (ता.20) कोल्हापुरात कार्यकर्त्यांसमोर प्रकटले होते आणि त्यांनी शक्तिप्रदर्शनही केले होते. मात्र, तलवार म्यान केल्यानंतरही ते महाविकास आघाडीच्या मेळाव्याला न गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानंतर आज लगेचच ते मातोश्रीवर हजर झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

ही पोटनिवडणूक लढवावी यासाठी क्षीरसागर यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव होता. त्यासाठी त्यांना कार्यकर्ते फोनवरून विचारणा करत होते. यामुळे क्षीरसागर दोन दिवस नॉट रिचेबल होते. या कालावधीत त्यांनी मुंबईत काही नेत्यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. काल कोल्हापुरात महाविकास आघाडीचा मेळावा झाला. या मेळाव्याला क्षीरसागर अनुपस्थित राहिले. याचवेळी त्यांनी आपल्या कार्यालयासमोर शक्तिप्रदर्शन केले. याची दखल घेऊन त्यांना आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चेसाठी मुंबईत बोलावले होते. मातोश्रीवर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे समजते.

कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढवण्याची इच्छा स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केली होती. पण शिवसेनेने काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना पाठिंबा द्यायचे ठरविले आहे. यामुळे काँग्रेसच्या जयश्री जाधव या आता महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. उत्तर मतदारसंघातून शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळावी, असा आग्रह स्थानिक शिवसैनिकांनी धरला होता. शिवसेनेचे संपर्क मंत्री उदय सामंत यांनी पक्षप्रमुख यांच्या कानावर स्थानिक शिवसैनिकांच्या भावना घालू, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मधून शिवसेना लढण्याची चर्चा सुरु झाली होती.

शिवसैनिकांची भूमिका लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीला सामंत यांच्यासोबत राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते. तसेच, पालकमंत्री सतेज पाटील हेही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेने जयश्री जाधव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेने आपला उमेदवार निवडणुकीत उतरवणार नसून महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव याच असतील, असे जाहीर केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT