Ramdas Athawale  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : आठवले शिर्डी, सोलापूर मतदारसंघासाठी अमित शाहांना भेटले; उमेदवारही केले फिक्स!

Vijaykumar Dudhale

Solapur News : महायुतीमध्ये सोलापूर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) मिळावा, यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. शिर्डीतून मी उमेदवार असेन आणि सोलापूर लोकसभेसाठी राजाभाऊ सरवदे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. (Solapur Loksabha Constituency)

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय असणार, याबाबत आठवले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, येत्या काळात लोकसभा निवडणुका आहेत, एनडीएला 400 जागा मिळतील. एनडीएला 2014 पेक्षा जास्त जागा 2019 ला मिळाल्या आहे. विविध राज्यांतील निवडणुकांतही भाजप पुढे आलेले आहे. (RPI Political Party)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रिपब्लिकन पक्षाला राज्यात मंत्रिपद मिळावे, अशी आमची मागणी होती. पण, विस्ताराच्या आधीच अजित पवार आले. अजूनही वेळ गेलेली नाही. आम्हाला राज्यात मंत्रिपद मिळेल, असे सांगून आठवले म्हणाले, सोलापूर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला मिळावा, ही आमची मागणी आहे. त्या संदर्भात मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहे. शिर्डी लोकसभेत मी उमेदवार असेन आणि सोलापूर लोकसभेसाठी राजाभाऊ सरवदे यांना उमेदवारी देण्यात यावी.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी चिन्ह मिळाले, त्यावरही आठवले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, शरद पवारांना मिळाली आहे तुतारी, पाहुयात गावागावांत किती ऐकणार त्यांचं म्हातारी. शरद पवार यांचे चिन्ह गेले, हे त्यांच्यामुळेचं गेले आहे. ते जर एनडीएसोबत आले असते तरी त्यांचा पक्षही एकत्र राहिला असता. शरद पवार यांनी यापूर्वीही पुलोद सरकार वेळी जनसंघासोबत युती केलेली होती, अशी आठवणही आठवले यांनी करून दिली.

उद्धव ठाकरेंनी मला 2014 मध्ये उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्या सोबतच केंद्रात अवजड उद्योगमंत्री पदाचीही ऑफर होती. मात्र, भाजपने मला राज्यसभेवर पाठवले होते. शिवसेनेने युती तोडली नसती आणि 2019 उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले नसते तरी ठाकरे यांचा पक्ष फुटला नसता, असेही आठवले यांनी नमूद केले.

'वंचित आघाडीचे सुरु आहे तळ्यात-मळ्यात, बघूयात ते जातात कोणाच्या गळ्यात,' असे सांगून आंबेडकरांबाबत आठवले म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे जाणकार नेते आहेत. महाविकास आघाडीमध्ये ते जाण्यासाठी तयार आहेत. पण, त्यांना अजून घेतलेलं नाही. त्यांनी एवढा अपमान सहन करण्यापेक्षा सरळ आमच्यसोबत यावे, अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढवावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT