सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, ज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळावर की युतीसोबत लढायचे, याबाबत चर्चा झाली.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांना स्थानिक युतीचे निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले, तर रामराजे नाईक निंबाळकर यांनी बैठक टाळल्याने पक्षात मतभेदांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
अजित पवार यांनी पक्षाला सर्व पालिकांमध्ये उमेदवार उभे करण्याचे निर्देश दिले, तसेच गरज पडल्यास भाजप आणि शिंदे गटासोबत आघाडी करण्यास प्राधान्य द्यावे, असे सांगितले.
Satara, 07 November : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भाने सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईत आढावा बैठक घेतली. या बैठकीत नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली, त्यात निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुती म्हणून याबाबत विचारविनिमय झाला. स्थानिक पातळीवर युती आणि आघाडी करण्याचे अधिकार हे मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्याकडे देण्यात आले आहेत. मात्र, पक्षाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे सातारा राष्ट्रवादीतील निर्णयाच्या अधिकाराचा केंद्रबिंदू फलटणकडून वाईकडे सरकल्याचे दिसून येत आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वरळी डोम येथे झाली. त्या बैठकीला ज्येष्ठ नेते तथा माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) उपस्थित राहणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, रामराजे यांनी मात्र बैठकीला चकवा देत, फलटणचा गड अबाधित राखण्यासाठी मुलाखतींचे सत्र सुरू करण्यास प्राधान्य दिले.
विधानसभा निवडणुकीपासून रामराजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अंतर पडत गेल्याचे दिसून येते. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फलटणमधून दीपक चव्हाण यांची उमेदवारी एका सभेतून जाहीर केली होती. मात्र, रामराजेंनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारून दीपक चव्हाणांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीवर लढवायला भाग पाडले होते. त्यात चव्हाणांचा पराभव करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन पाटील निवडून आले आहेत. तेव्हापासून काहींसा दुरावा दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेपासून फारकत घेतलेले रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला मात्र हजेरी लावली होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रामराजे राष्ट्रवादीकडून मैदानात उतरतील, पक्षाचे नेतृत्व म्हणून सातारा जिल्ह्यात निवडणूक रणनीती आखतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ते पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
दरम्यान , सातारा जिल्ह्यात गतपालिका निवडणुकीपर्यंत बहुतांश ठिकाणी सत्तेत असणारी राष्ट्रवादी काँग्रेस यंदाच्या निवडणुकीतही आपली ‘दादा’गिरी सिद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत मुंबईतील बैठकीतून दिसून आले. सातारा जिल्ह्यात आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी मेढा नगरपंचायतीसह सर्व पालिकांमध्ये उमेदवार उभे करण्याची तयारी पक्षाकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यात आवश्यकतेनुसार युती, आघाडी करण्याचे सर्वाधिकार मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्याकडे असतील. युतीसंदर्भात निर्णय घ्यायचा झाल्यास प्रथम प्राधान्य भाजपला, शिवसेनेला (शिंदे गट) दिले जाणार आहे. सर्व नऊ नगरपालिका व मेढा नगरपंचायतीत उमेदवार देण्याची तयारी करा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. यामध्ये बहुतांशी जणांनी युतीसोबत जाऊन पालिकेची निवडणूक लढावी, अशी सूचना मांडली, तर काहींनी ज्या पालिकेत आपली ताकद आहे, तेथे स्वबळावर लढावे, अशी सूचना मांडली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गरज पडल्यास महायुतीतील घटक पक्षांसोबत जाऊन निवडणूक लढण्याची सूचना केली.
झेडपीचे नंतर पाहू
सर्वच पालिकेत उमेदवार देण्यासाठी प्रयत्न केले जातील. गरज पडल्यास युतीतील भाजप, शिंदे गट शिवसेनेलाही सोबत घेण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय केला जाईल. यावर अजित पवार यांनी स्थानिक पातळीवर पालिका निवडणुकीत निर्णय घेण्याचे अधिकारी मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांना असतील. पालिकेच्या निवडणुकीत युती करताना भाजपला प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केली. झेडपीचे नंतर पाहू गरज पडेल तेथे स्थानिक आघाड्यांशी युती करावी. जेणे करून राष्ट्रवादीचे नगरसेवक अधिकाधिक निवडून येतील. सुरुवातीला पालिकेमध्ये सर्वांनी लक्ष घालावे. जिल्हा परिषद, पंचायत समितीबाबत नंतर निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी सांगितले.
महाबळेश्वर, वाई, पाचगणीत ताकद
खासदार नितीन पाटील यांनी मत मांडताना वाई मतदारसंघातील महाबळेश्वर, वाई, पाचगणी या राष्ट्रवादीच्या विचारांच्या पालिका आहेत, तसेच इतर पालिकांमध्ये सातारा, रहिमतपूर, कऱ्हाड, मलकापूर, म्हसवड येथेही स्थानिक पातळीवर आघाड्यांशी चर्चा करून युती करण्याचा निर्णय घेतला जाईल. फलटणमध्येही आमदार सचिन पाटील यांच्यासह शिवरुपराजे खर्डेकर आणि इतरांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
Q1. सातारा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक कुठे झाली?
A1. ही बैठक मुंबईतील वरळी डोम येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Q2. स्थानिक युतीचे अधिकार कोणाला देण्यात आले?
A2. मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांना स्थानिक युतीचे अधिकार देण्यात आले.
Q3. रामराजे नाईक निंबाळकर बैठकीला उपस्थित होते का?
A3. नाही, त्यांनी बैठक टाळल्याने त्यांच्या भूमिकेबाबत चर्चा रंगल्या.
Q4. अजित पवार यांनी कोणत्या पक्षाला युतीसाठी प्राधान्य देण्याचे सुचवले?
A4. त्यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला प्राधान्य देण्याची सूचना केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.