Phaltan, 19 May : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना हा श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालविण्यासाठी देण्याचा निर्णय ठराव सर्वांनुमते संमत करण्यात आला. मात्र, त्याला विरोधातील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गटाने आक्षेप घेतला आहे. कारखान्यावर सध्या प्रशासक असल्याने हा ठराव बेकायदेशीर आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.
रामराजे गटाची सत्ता असलेला श्रीराम सहकारी साखर कारखाना हा पूर्वी इचलकरंजीचे माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांना देण्यात आला होता. मात्र, त्यांनी परवडत नसल्याचे कारण सांगून कारखाना चालविण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे रामराजे गटाने हा कारखाना श्री दत्त इंडिया प्रा. लिमिटेडला चालविण्यासाठी देण्याचा ठराव मंजूर करून घेतला.
सुमारे दोन हजार सभासदांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत श्रीराम सहकारी साखर कारखान्याची पुढची वाटचाल आता श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या अखत्यारित असणार आहे. मात्र, रामराजे गटाचा हा निर्णय वादात सापडला आहे. या निर्णयाला विरोधकांकडून जोरदार आक्षेप घेण्यात आलेला आहे.
कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा झाली. त्या सभेला आमदार रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, सत्यजितराजे नाईक निंबाळकर, कारखान्याचे माजी अध्यक्ष नितीन भोसले, धनंजय पवार, रेश्मा भोसले, सचिन सूर्यवंशी-बेडके, जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, विश्वासराव भोसले, ॲड. नरसिंह निकम, महेंद्र सूर्यवंशी बेडके उपस्थित होते.
कल्लाप्पा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. हुपरी यांच्याबरोबर झालेला भागीदारी करार रद्द करणे आणि ८ सप्टेंबर २०२० निर्णयाप्रमाणे स्वारस्य अभिव्यक्ती नुसार कारखाना, अर्कशाळा, देशी व विदेश मद्य विभाग सहकारी अथवा खासगी कारखान्यास सहयोगी तत्त्वावर चालवायला देणे या विषयी निर्णय घेण्यात आले.
दरम्यान, आवाडे यांच्या जवाहर कारखान्याने मध्येच करार मोडल्याने सभासद आणि कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सभासदांचेही नुकसान झाले आहे, असा दावा निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, शिवरूपराजे खर्डेकर, ॲड. नरसिंह निकम यांनी केला. मंत्री समिती व कोल्हापूर खंडपीठाने दिलेल्या सूचनांचे पालन केले नसल्याचे विरोधकांनी सांगत तब्बल ४४ कोटी रुपयांच्या नुकसानीचा प्रश्न उपस्थित केला.
विरोधकांच्या आक्षेपाला संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उत्तर दिले. सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे, असे सांगून त्यांनी आरोप फेटाळून लावले. शरयू कारखाना आणि श्रीदत्त इंडिया प्रा. लि. कडून कारखाना आणि अर्कशाळा चालविण्यासाठी निविदा आल्या होत्या, त्यात श्रीदत्त इंडिया प्रा. लि. कडून साडेसहा कोटी रुपयांचे भाडे मिळणार आहे. त्यामुळे कारखाना श्री दत्त इंडिया कारखान्याला चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे, असे निंबाळकर यांनी यांनी स्पष्ट केले.
श्रीराम’च्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार : ॲड. नरसिंह निकम
दरम्यान, श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांची मुदत संपलेली आहे. त्यामुळे त्यांना सभा घेण्याचा अधिकारच नाही, वार्षिक सभेत कारखाना श्री दत्त इंडिया कंपनीला चालवण्यास देण्याचा ठराव मंजूर करून घेणे चुकीचे आहे. हा निर्णय शेतकरी सभासदांच्या हिताविरोधात असून, आम्ही या विरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत, असे ॲड. नरसिंह निकम यांनी वार्षिक सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, विश्वासराव भोसले आदी उपस्थित होते.
कारखान्यावर अजूनही ११५ कोटींचं कर्ज
श्रीराम कारखाना २००६ पासून चालविण्यास दिलेल्या करारावेळी कारखाना २०२१ पर्यंत कारखाना होईल, असे सांगण्यात आले होते, मात्र आजही कारखान्यावर तब्बल ११५ कोटी रुपयांचा देणं आहे. कारखाना कर्जमुक्त झाला असेल, तर पुन्हा दुसऱ्या कराराद्वारे चालवायला देण्याचा आग्रह का, असा सवाल ॲड निकम यांनी केला.
कारखाना सहकारी तत्त्वावर चालवावा :शिवरूपराजे
कारखाना सहकारी तत्त्वावरच चालवावा, अशी आम्ही भूमिका घेऊन सभेत आलो होतो. मात्र, कारखाना खासगी तत्त्वावर चालवून काही मोजक्या लोकांचा फायदा केला जात आहे. संचालक मंडळाने स्वतः कारखाना चालवला, तर स्पर्धा राहील, शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल आणि सहकार जिवंत राहील, ही आमची भूमिका होती व यापुढेही राहील, असे शिवरूपराजे खर्डेकर यांनी सांगितले.
पाच वर्षांत कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम करू : समशेरसिंह नाईक निंबाळकर
श्रीराम साखर कारखाना हा व्यवसाय म्हणून पाहिला जात असून, नफा काही मोजक्या लोकांना वाटला जात आहे. आम्हाला संधी दिल्यास पाच वर्षांत कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून दाखवू, असे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दावा केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.