Pune News : वादग्रस्त व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांची वाय प्लस दर्जाची पोलिस सुरक्षा अखेर मागे घेण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) विशेष पोलिस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. आता सूर्यवंशी यांना केवळ एका गनमॅनचे संरक्षण देण्यात येणार आहे. दुसरीकडे, त्यांच्यावरील कथित हल्ल्याला १३ दिवस उलटूनही या प्रकरणामागील नेमके कारण आणि सूत्रधारांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे सुरक्षा हटविण्याच्या निर्णयासह तपासाच्या दिशेवरही चर्चा सुरू झाली आहे.
१७ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या आदेशानुसार सूर्यवंशी यांना वाय प्लस दर्जाची वर्गीकृत सुरक्षा देण्यात आली होती. या व्यवस्थेत मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात होते. तसेच त्यांच्यासाठी एस्कॉर्ट वाहनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, आता ही संपूर्ण सुरक्षा व्यवस्था मागे घेण्यात आली असून, एकाच गनमॅनची नियुक्ती करण्यात आली आहे.
हल्ल्याच्या तपासात संशयाचे नवे वळण
१८ ऑक्टोबर रोजी बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी सूर्यवंशी यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. सुरुवातीला गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, तपासादरम्यान धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सूर्यवंशी यांच्या निकटवर्तीयांपैकी तीन व्यक्ती संशयाच्या कक्षेत आल्याची माहिती आहे. पोलिसांकडून चौकशी किंवा ताब्यात घेतले जाण्याची शक्यता असल्याने हे तिघे पसार झाल्याचे सांगितले जाते. त्यांचा शोध घेणे हे पोलिसांसमोरील आव्हान बनले आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर महासंचालकांची नाराजी
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. सूर्यवंशी यांच्या ताफ्यात पुणे शहरासह अन्य जिल्ह्यांतील पोलिस कर्मचारी तैनात असल्याची बाब बैठकीत समोर आल्याचे समजते. सुरक्षा मंजुरीचे निकष आणि मनुष्यबळाच्या नियोजनातील त्रुटींवर महासंचालकांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. ही बैठक सुमारे तीन तास चालली. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येते. तसेच या प्रकरणाची चौकशी अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता (कायदा व सुव्यवस्था) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर मिळाली होती सुरक्षा
सूर्यवंशी यांची राणा शिपिंग कंपनीसह गडचिरोली परिसरात व्यावसायिक गुंतवणूक असल्याची माहिती आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये अक्कलकोट येथेही त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्यांना उच्चस्तरीय सुरक्षा पुरविण्यात आली होती. मात्र, एका व्यावसायिकाला एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय तेव्हापासून चर्चेत होता.
सूर्यवंशी हे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मगरपट्टा परिसरात वास्तव्यास आहेत. सुरक्षा कपातीनंतर त्यांना पुढील आदेशापर्यंत एका गनमॅनचे संरक्षण देण्यात आले आहे. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. हल्ल्याचे कारण, संशयितांचा सहभाग आणि सुरक्षा मंजुरीमागील निकष या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे सुरक्षा हटविण्याचा निर्णय आणि अपूर्ण तपास यामुळे राणा सूर्यवंशी प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.