Rana Suryavanshi: स्वतःवरील हल्ल्याचा बनाव उघडा पडताच राणा सूर्यवंशी पसार; रुबी हॉलमधून पोलिसांना गुंगारा?

Baramati Airport Attack: बारामती विमानतळाजवळील हल्ला बनावट असल्याचा पोलिसांचा दावा आहे. प्रकरणात दोघांना अटक, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून राणा सूर्यवंशीसह अन्य तिघांचा शोध सुरू आहे.
Rana Suryavanshi
Rana SuryavanshiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Baramati Airport Attack News : बारामती विमानतळ परिसरात आपल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची तक्रार करणाऱ्या राणा सूर्यवंशी याच्याच भोवती आता पोलिसांच्या तपासाचा फास आवळला आहे. हा हल्ला बनावट असल्याचा निष्कर्ष पोलिसांच्या तपासात निघाल्यानंतर, पुढील चौकशीसाठी पोलीस पोहोचण्यापूर्वीच राणा पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून पसार झाला आहे. या प्रकरणात त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. कटात सहभागी असल्याचा संशय असलेल्या अन्य तीन मित्रांचा पोलीस शोध घेत आहेत.

राणा सूर्यवंशी याने १८ ऑक्टोबर रोजी बारामती विमानतळाजवळील पालखी महामार्गावरील पायलट ढाब्याजवळ आपल्यावर हल्ला झाल्याची तक्रार बारामती पोलिसांकडे केली होती. गोजुबावी परिसरात उभा असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने जवळ येत पिस्तूल दाखवून लोखंडी सत्तूराने वार केल्याचा दावा त्याने केला होता. या हल्ल्यात उजव्या हाताच्या दंडावर आणि पोटावर जखमा झाल्याने त्याला उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तपासात विसंगती; हल्ल्याचा बनाव उघड

हल्ल्याची माहिती मिळताच बारामती उपविभागीय पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण आणि उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करताना पोलिसांना अनेक विसंगती आढळल्या. त्यानंतर केलेल्या तपासातून हा हल्ला पूर्वनियोजित आणि बनावट असल्याचे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Rana Suryavanshi
Mula Mutha River: 990 कोटींच्या जायका प्रकल्पात ‘गावठी’ कारभार! चिखलात मलवाहिन्या, पोकलेनने पाइप ढकलले

या प्रकरणात पार्थ अवथडे आणि स्वप्नील कांबळे यांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हल्ल्याचा बनाव रचण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे. या कटात आणखी तीन मित्रांचा सहभाग असल्याचा संशय असून, त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांच्या चौकशीपूर्वीच रुग्णालयातून काढता पाय

कथित हल्ल्यामागील कट उघड झाल्यानंतर पोलिसांना राणा सूर्यवंशी याची सविस्तर चौकशी करायची होती. त्यासाठी रुग्णालय प्रशासनाला कळविण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, पोलीस पथक रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच राणा तेथून निघून गेला. त्यामुळे त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

राणा रुग्णालयात उपचार घेत असतानाही त्याच्यासोबत खासगी सुरक्षा रक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. रुबी हॉल रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांशी त्याचे जवळचे संबंध असल्याचेही पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात रुग्णालयाची नवीन शाखा सुरू करण्याच्या प्रक्रियेत त्याने मध्यस्थी केल्याची माहितीही चर्चेत आहे. मात्र, रुग्णालयातील त्याचे संबंध आणि तेथून पसार होण्याच्या घटनेचा परस्परांशी काही संबंध आहे का, याबाबत अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही.

Rana Suryavanshi
Jalgaon Politics : शिंदे शिवसेनेतील नाराज नेत्याची सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत उडी, घड्याळ हाती बांधताच खदखद बाहेर

तीन मित्रांचा शोध; राणाच्या अटकेकडे लक्ष

बनावट हल्ल्याच्या प्रकरणात काही जणांवर कारवाई झाल्यानंतर राणा सूर्यवंशी पसार झाल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. हल्ल्याचा कट नेमका कोणी रचला, दोन लाख रुपयांच्या व्यवहारात कोणाची भूमिका होती आणि अन्य तीन मित्रांचा या प्रकरणातील सहभाग किती, याचा तपास पोलीस करत आहेत. राणा सूर्यवंशी याचा शोध घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर या कथित हल्ल्यामागील उद्देश आणि संपूर्ण कटातील इतर सहभागींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com