Ranjitsinh Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjitsinh Mohite Patil : मोहिते पाटलांनी ओळखला होता धोका; DCCसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सहकारमंत्र्यांना लिहिले होते पत्र

Solapur Dcc Bank Election 2026 : कलम 88 कारवाईविरोधातील माजी संचालकांचे अपील सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे प्रलंबित आहे. स्थगिती अर्जावर लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली होती.

प्रमोद बोडके

Solapur, 15 November : सहकार कायदा कलम ८८ अन्वये झालेल्या कारवाईवर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे माजी संचालकांचे अपिल प्रलंबित आहे. या अपिलावर दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने ६ मार्च २०२५ रोजी दिले आहेत. या अपिलावरील शेवटची सुनावणी १२ ऑगस्ट २०२६ रोजी झाली असून स्थगिती अर्जावरील आदेश शक्य तितक्या लवकर घ्यावा, अशी मागणी माजी आमदार तथा डीसीसीचे माजी संचालक रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे २६ ऑक्टोबर २०२६ रोजीच केल्याचे आता समोर येऊ लागले आहे.

सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज अपात्र झाल्यानंतर माजी संचालक रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, जयवंतराव जगताप, दिलीप माने, बबनराव आवताडे व सुरेश हसापुरे या सहा माजी संचालकांनी ॲड. गिरीश गोडबोले व ॲड. अभिजीत कुलकर्णी यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर झालेल्या सुनावणीत माजी संचालकांच्या वकिलांनी सहकारमंत्र्यांकडे असलेल्या अपिलाची सुनावणी ऑगस्टमध्ये पूर्ण झाली आहे. त्यांनी दोन दिवसात निर्णय घ्यावा, असे आदेश आपण द्यावेत, अशी विनंती न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्याकडे केली होती.

माजी संचालकांच्या विनंतीवर ‘उमेदवारी अर्ज अपात्र झाल्यावर तुम्ही ही मागणी का करता?, यापूर्वी ही मागणी का केली नाही?’, असा सवाल न्यायमूर्ती मंत्री यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना विचारला होता. त्या अपिलाची सुनावणी ऑगस्टमध्ये पूर्ण झाली आहे, जास्तीत जास्त महिनाभरात आदेश होईल, असे वाटल्याने आम्ही मागणी केली नसल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले होते.

माजी संचालक मोहिते-पाटील यांनी या संदर्भातील पत्र सहकारमंत्र्यांना २६ ऑक्टोबर २०२६ रोजीच दिले असून, त्याची पोहोच आमच्याकडे असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकिल ॲड. अभिजित कुलकर्णी यांनी सांगितले.

ज्या दिवशी मोहिते-पाटील यांनी सहकारमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली, त्याच दिवसापासून म्हणजे २६ ऑक्टोबरपासूनच बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. युक्तीवाद पूर्ण झालेल्या सुनावणीचा निकाल उद्या (सोमवारी, ता. १६ नोव्हेंबर) येणार आहे. माजी संचालक मोहिते-पाटील यांच्या त्या पत्राचा काही उपयोग या याचिकेच्या आदेशासाठी होतो का?, हे सोमवारी आदेश आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT