Ram Satpute-Ranjitshinh Mohite Patil-Uttam Jankar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjitshinh Mohite Patil : रणजितदादा, सांगा तुम्ही नेमके कुणाचे?; राम सातपुतेंच्या दाव्यानंतर चर्चेला उधाण...

Malshiras Assembly Constituency : आमदार राम सातपुते यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे अजूनही भाजपमध्ये आहेत, असा दावा केला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 31 October : माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने अपेक्षेनुसार विद्यमान आमदार राम सातपुते यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे मात्र, सातपुते यांना आमदारकीची निवडणूक मागच्याएवढी सोपी नसणार, हे उघड आहे. कारण मोहिते पाटील यांची ताकद या वेळी सातपुते यांचे विरोधक असलेल्या जानकरांच्या पाठीशी असणार आहे.

मात्र, सातपुते यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे अजूनही भाजपमध्ये आहेत, असा दावा केला आहे, त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या व्यासपीठावर जाऊन सातपुतेंचा प्रचार करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत उमेदवारीमध्ये डावलल्यानंतर मोहिते पाटील यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला होता. धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत जिंकली आहे.

त्या निवडणुकीपासून रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitshinh Mohite Patil) हे भाजपपासून चार हात लांब होते. भाजप आणि खुद्द भावाच्या (धैर्यशील मोहिते पाटील) प्रचार सभेलाही त्यांनी हजेरी लावली नव्हती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) लोकसभा निवडणुकीत जेव्हा अकलूजमध्ये आले होते, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील थांबले होते. मात्र, नाराज फडणवीस हे तेव्हा मोहिते पाटील यांचा सत्कार स्वीकारायला थांबले नव्हते.

तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची त्यामागे भूमिका असल्याची चर्चा त्या वेळी होती. मोहिते पाटील आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीपासूनच अंतर पडले होते. नाही म्हणायला रणजितसिंह यांनी भाजपच्या प्रदेश स्तरावरील अधिवेशनाला पुण्यात हजेरी लावली होती. मात्र, सोलापूरच्या राजकारणात त्यांनी भाजपपासून चार हात लांब राहणेच पसंत केलेले आहे.

अकलूज येथे नुकत्याच झालेल्या ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यक्रमात मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतीही टोकाची भूमिका घेण्याची आपली तयारी आहे, असे सांगितले होते. त्यातून रणजितसिंह मोहिते पाटील आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे.

दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील हे महाविकास आघाडीकडून विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवतील, अशी चर्चा रंगली होती. माढा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आला खरा मात्र पक्षाकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT