Ranjeetsingh Nimbalkar | ramraje nimbalkar  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramraje Vs Ranjitsinh : रामराजेंनी 'तुतारी' हाती घेण्याचे संकेत देताच रणजितसिंह निंबाळकरांनी डागली तोफ

Akshay Sabale

विधान परिषदेचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) ज्येष्ठ नेते, रामराजे नाईक-निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लक्ष्य केलं होतं. कार्यकर्त्यांवर तपास यंत्रणांकडून त्रास होत आहे, असं म्हणत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मनावर न घेतल्यास कार्यकर्त्यांना साक्षी ठेवून ऐतिहासिक निर्णय घेऊ, असं म्हणत एकप्रकारे 'तुतारी' हाती घेण्याचे संकेत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले होते. यावरून माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर तोफ डागली आहे.

रामराजे हे निश्चितपणे 'तुतारी'कडे जाणार हे महाराष्ट्राला माहीत आहे. फक्त 'तुतारी'कडे जाताना कोणावर तरी ठपका ठेवून जायचे म्हणून माझ्याकडे बोट दाखवत 'तुतारी'कडे जायचे ठरवलं आहे, अशी रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( ranjitsinh naik nimbalkar ) यांनी केली आहे. फलटण-बारामती रेल्वेची पाहणी करताना ते बोलत होते.

रामराजेंनी शेकडो कोटींचा लाभ करून घेतला...

रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, "रामराजे नाईक-निंबाळकर यांन कंबरेखालचे बोलायचे सवय लागली आहे. रामराजे हे निश्चितपणे 'तुतारी'कडे जाणार, हे महाराष्ट्राला माहीत आहे. आतापर्यंत शेकडो कोटींचा लाभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Ajit Pawar ) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत करून घेतला. मात्र, 'तुतारी'कडे जाताना कोणावर तरी ठपका ठेवून जायचे म्हणून माझ्याकडे बोट दाखवत 'तुतारी'कडे जायचे ठरवलं आहे."

रामराजेंना लाल दिव्याची सवय...

"रामराजे नाईक-निंबाळकर यांचा सत्तेत राहण्याचा प्रयत्न असतो. ते अपक्ष आमदार झाले, तेव्हा शिवसेना-भाजपला जवळ करत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळवले. 1999 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे सत्ता आल्यावर ते तिकडे गेले. त्यांना लाल दिव्याची सवय लागली आहे," असा टोला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांना लगावला आहे.

युतीधर्म पाळला नाही..

"महायुतीचा धर्म रामराजे यांनी पाळला नाही. लोकसभेला त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. आघाडी आणि महायुती, अशा विषयांवर त्यांनी बोलू नये," अशा शब्दांत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सुनावलं आहे.

रामराजे नेमकं काय म्हणाले?

"सभापती असताना मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न दोघांनी केले", असा गंभीर आरोप रामराजे नाईक-निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा उल्लेख न करता केला.

"अमित शहा यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्रमाला येऊ दिले नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर ईडी लावली जाते. खोट्या केसेसची भीती दाखवली जातेय. याबाबत अजितदादांना बोललो आहे. तरीही त्यात बदल झाला नाही. ज्या सत्तेत कार्यकर्ते सुरक्षित नाहीत, ती सत्ता काय कामाची? आम्ही काय करायचे, ते अजितदादांनी ठरवावे. अजितदादांनी मनावर न घेतल्यास आम्ही कार्यकर्त्यांना साक्षी ठेवून निर्णय घेऊ," असे राजकीय परिवर्तनाचे संकेत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT