Rashmi and Digvijay Bagal
Rashmi and Digvijay Bagal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

‘मकाई’ची पुण्याई कामी येणार...बागल गटाला बहिणभावांची धडपड नवसंजीवनी देणार?

​अण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळ्याच्या (Karmala) राजकारणावर एकेकाळी निर्विवाद वर्चस्व गाजवणारा बागल गट सध्या निकराची राजकीय लढाई लढतो आहे. आमदारकीपासून ग्रामपंचायतींपर्यंत बागल यांच्याकडे तालुक्यातील सर्व सत्तास्थाने होती. सध्या मात्र त्यांच्याकडे मकाई आणि आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांची सत्ता आहे. त्यातही आदिनाथ हा ‘बारामती ॲग्रो’ला चालवण्यास दिल्याबद्दल रोष व्यक्त होत आहे. मात्र, स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून मकाई कारखाना वाचविण्याची बागल बहिण-भावाची धडपड सुरू आहे. हीच पुण्याई बागल गटाला तालुक्याच्या राजकारणात तारणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Rashmi and Digvijay Bagal's efforts to save Bagal group in Karmala)

मांगीसारख्या गावातील सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले दिगंबर बागल हे दोन वेळा करमाळ्याचे आमदार बनले. त्यांनी मांगी गावच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर करमाळा पंचायत समितीचे सभापती ते  राज्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. मात्र, विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत माजी आमदार जयंतराव जगताप यांनी बागल यांचा पराभव केला. वर्षभरानंतर म्हणजे २००५ मध्ये त्यांचे निधन झाले. मात्र, २००९ ची  विधानसभा निवडणूक दिगंबर बागल यांच्या पत्नी श्यामलाताई बागल यांनी लढवली आणि त्या आमदार बनल्या. मधल्या काळात लागलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाचे नेतृत्व रश्मी बागल यांनी केले. त्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर असलेल्या मोहिते पाटील गटाला धक्का देत आदिनाथची सत्ता मिळविली होती. त्यावेळी रश्मी बागल यांचे नाव राज्यभरात झाले होते.

दिगंबर बागल यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्यामल, मुलगी रश्मी यांनी विलास घुमरे यांच्या सल्ल्याने करमाळ्याच्या राजकारण केले. बागल गटाची राजकीय घडी बसवण्यात घुमरे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2017 पर्यंतच्या सर्व निवडणुकांपर्यंत बागल गटाने तालुक्यावर  निर्विवाद वर्चस्व राखले होते. मात्र, पंचायत समितीची सत्ता २०१७ च्या निवडणुकीत त्याच्या हातून निसटली. तत्पूर्वी २०१४ ची विधानसभा निवडणूक  बागल यांच्या कन्या  रश्मी बागल यांनी लढवली. मात्र, त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर तालुक्याची राजकीय सत्ताही त्यांच्या हातातून हळूहळू निसटू लागली. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, ही निवडणूक शिवसेनेकडून लढवूनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

बागल गटाला आतापर्यंत आदिनाथ आणि मकाई या सहकारी सहकारी साखर कारखान्यांची सत्ता ताब्यात ठेवण्यात यश आलेले आहे. मकाई कारखान्याची धुरा दिगंबर बागल यांचे चिरंजीव दिग्विजय हे सांभाळत आहेत. हा कारखाना सुरुळीत चालू ठेवण्यासाठी त्यांनी यावर्षी मोठे प्रयत्न चालवले आहेत. मकाई सर्व बाजूंनी अडचणी असूनही स्वतःची  प्रॉपर्टी तारण ठेवून कर्ज उचलून त्यांनी कारखाना सुरू केला आहे,  ही बागल गटासाठी जमेची बाजू आहे. दुसरीकडे मात्र आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद असणे  आणि तो बारामती ॲग्रोला चालवण्यास देणे बागल गटासाठी अडचणीचे झाले आहे.

राष्ट्रवादीशी जवळीक कायम

बागल गटाची विस्कटलेली घडी सध्या तालुक्याच्या राजकारणात बसवण्यासाठी  दोघेही बहिण भाऊ जोदार प्रयत्न करताना दिसत आहेत. आगामी आदिनाथ व मकाई कारखान्याची निवडणूक, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थानं या दोघा बहीण-भावाच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. सध्या शिवसेनेत असूनही बागल गटाला फारसा फायदा होताना दिसत नाही. तशी आजही बागल यांची राष्ट्रवादीशीच जवळीक आहे. आगामी निवडणुकीत  बागल गटाची दिशा नेमकी काय असणार, हे समजणार आहे. बागल गटाला उर्जितावस्था आणण्यासाठी बहिणभावांना मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT