पंढरपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) भल्या भल्यांची मस्ती आणि धुंदी उतरवली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने बघाल, तर डोळे काढू असा गर्भीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आज दिला. तुपकरांच्या या इशाऱ्यानंतर स्वाभिमानी विरुध्द दिग्विजय बागल असा संघर्ष निर्माण झाला आहे. दरम्यान आज दिग्विज बागल यांच्या विरोधात ठिकठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली. (Ravikant Tupkar's warning to Digvijay Bagal who beat up Swabhimani's office bearer)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे युवा अध्यक्ष विजय रणदिवे यांना शनिवारी (ता. 11 डिसेंबर) मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी मारहाण केली होती. मारहाणीचा व्हीडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाला आहे. या मारहाणीच्या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राज्यभरातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बागल यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकरांनी या घटनेचा निषेध करत सोमवारी (ता.13 डिसेंबर) आपण स्वतः करमाळ्यात येणार असून तुमचे किती गुंड आहेत ते घेऊन या. आम्ही शेतकऱ्यांची फौज घेऊन येतोय, असे सांगत दिग्विजय बागल यांना थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे. या संदर्भात रविकांत तुपकर यांनी रविवारी (ता. १२ डिसेंबर) सोशल मीडियाच्या माध्यमातून मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांना थेट आव्हान देत हा इशारा दिला आहे.
लय मस्ती करु नका, माज करु नका, भल्या भल्यांचा माज उतरवणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. येथून पुढे स्वाभिमानीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांकडे वाकड्या नरजेने बघायचा प्रयत्न केला, तर डोळे काढून ठेवल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. मी स्वतः उद्या (ता.13) करमाळ्याला येतोय. कोणत्या चौकात यायचं किती वाजता आणि कुठ यायंच. किती गुंडांची तुमच्याकडे फौज आहे. ती फौज घेऊन या. आम्ही शेतकऱ्यांची फौज घेऊन येतो. बघू तुमच्यात हिंमत आहे की नाही. तुमच्यासोबत दोन हात करण्याची आमची तयारी आहे. इथून पुढं जर शेतकऱ्यांवर हात उचलायचा प्रयत्न केला, तर दात घशात घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे कार्यकर्त्यांसह मकाई कारखान्यावर थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शनिवारी (ता. ११ डिसेंबर) गेले होते. त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल व त्यांच्या समर्थकांनी रणदिवे यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या घटनेनंतर थकीत एफआरपीच्या मुद्द्यावरुन सोलापूर जिल्ह्यात आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.