PM Modi  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

PM Modi: मोदींनी दिली त्यांच्या तिसऱ्या टर्मची गॅरंटी; म्हणाले, 'आगामी निवडणुकीत भाजपचेच सरकार...

Anand Surwase

Solapur News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी निवडणुकीत देशात भाजपचेच सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. याशिवाय पंतप्रधान म्हणून आपण तिसरी टर्म पूर्ण करणार असल्याचेही भाकीत त्यांनी केले आहे. माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जगातील टॉप तीन मधील एक अर्थव्यवस्था होईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सोलापुरातील रे नगर या देशातील सर्वात मोठ्या 30000 घरांच्या कामगार वसाहतीचे लोकापर्ण करताना मोदींनी आगामी काळात सत्तेत आपणच येणार असल्याचे भाष्य केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. एकाच आठवड्यात मोदींचा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. सोलापूर शहरातील कुंभारी येथे तब्बल 30000 घरांचा महाकाय प्रकल्प साकारला जात आहे. त्यातील 15000 घरांचे शुक्रवारी मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मोदींनी आपल्या कारकिर्दीमध्ये कशा प्रकारे केंद्र सरकारकडून गरिबांचे प्रश्न सोडवले जात आहेत याचा लेखा जोखा मांडला. देशाला विकसित राष्ट्र करण्यासाठी आत्मनिर्भर भारत बनवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

याशिवाय देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम भाजप सरकारने केल्याचे सांगतानाच माझ्या तिसऱ्या कारकिर्दीमध्ये देश जगातील टॉप तीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होईल. मी याची देखील गँरटी देत असल्याचे मत व्यक्त करत आपण आगामी काळात भाजपचेच सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येईल आणि पंतप्रधान म्हणून तिसऱ्या टर्ममध्ये मीच देशाच्या विकासाला हातभार लावेल असा आत्मविश्वासच मोदींनी यावेळी व्यक्त केला. तसेच देशाची अर्थव्यवस्था टॉप तीनवर पोहोचवण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

माझे सरकार गरिबांसाठी समर्पित सरकार आहे. गरिबांचे स्वप्ने पूर्ण करणे हाच माझा संकल्प आहे. दहा वर्षापूर्वी देशात सर्वत्र फक्त झोपड्या दिसत होत्या. मात्र आता आम्ही झोपड्या ऐवजी पक्की घरे देत आहोत. आज शहरात कॉलनी उभ्या केल्या जात आहेत. कामगारांना भाड्याने घरे उपलब्ध करून दिले जात आहे. यापूर्वी गरीबी हटावचे नारे दिले जायचे. मात्र गरीबी कधी हटली नाही. अर्धी भाकर का खायची आणि घोषणा द्यायचा ही वेळ आता मोदी सरकारच्या काळात येणार नसल्याचाही शब्द देत त्यांनी भाषणातून काँग्रेस सराकारच्या कारकिर्दीवर निशाणा साधला.

गॅरंटी पूर्ण करण्याची गॅरंटी

यावेळी मोदी यांनी काँग्रेसच्या गॅरटी योजनेवर निशाणा साधत मोदी यांची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरटी असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या माध्यातून आरोग्य, रोजगार, निवारा, मुलभूत सोयीसुविधांच्या योजनांची माहिती देत ही मोदी सरकारने पूर्ण केलेली गॅरंटी आहे. आमची नियत साफ आहे आणि आमची निष्टा देशाप्रती आहे. त्यामुळे भारताला विकसीत राष्ट्र बनवण्यासाठी आमच्या सरकारने दिलेली गॅरंटी आम्ही पूर्ण करणार असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

सोलापुरकरांसाठी घोषणा नाहीच

पंतप्रधान मोदीं आज भाषण करताना कामगारासाठी काही तरी योजना सुरू करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र भाषणात मोदींनी केवळ केंद्र सरकारच्या योजनांचा पाढा वाचून दाखवला. याशिवाय कॉम्रेड आडम मास्तर यांनी ज्या मागण्या केल्या होत्या, त्या मागण्यांचा त्यांनी पुसटसाही उल्लेख केला नसल्याचे यावेळी दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT