Pandharpur, 01 May : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विक्रमी मतांनी विजयी होतील, असा भलामोठा शुभेच्छा देणारा बॅनर पंढरपूरच्या वेशीवर लावण्यात आला. हा बॅनर लक्षवेधी ठरत असून त्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघतात मृत्यू झाला आहे. त्यांच्या अकाली मृत्युमुळे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच, पक्षाची धुराही अध्यक्षा म्हणून त्या सांभाळत आहेत.
अजित पवार यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी लढवली आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीसाठी सर्वपक्षीयांनी प्रयत्न केले. मात्र, काही लोकांमुळे बारामतीत निवडणूक लागली आहे. त्याची मतमोजणी येत्या ४ तारखेला आहे. त्यात सुनेत्रा पवार ह्या विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वास अजितदादांचे समर्थक वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करत आहेत. तसाच प्रयत्न पंढरपुरातील अजितदादा प्रेमींनी केला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी पंढरपूर शहरात सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा बॅनर लावला आहे. श्रीकांत शिंदे हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी आपल्या घरातील देवघरातही अजितदादा पवार यांची प्रतिमा दोन वर्षांपूर्वी प्रतिष्ठापित केलेली आहे.
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देणारा बॅनर शिंदे यांच्याकडून लावण्यात आला आहे. विक्रमी मताधिक्य...नातं तुमचं आमचं...ऋणानुबंध असा मजकूर असलेला दहा बाय तीस आकाराचा भलमोठा लक्षवेधी बॅनर शिंदे यांनी लावला आहे.
बॅनरवर दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचाही फोटो लावण्यात आला आहे. त्याखाली माझा विठ्ठल असे लिहिण्यात आले आहे. त्यातून श्रीकांत शिंदे यांनी अजित पवार यांच्यावरील निष्ठा आजही कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
श्रीकांत शिंदे हे सर्वसामान्य कार्यकर्ते असून त्यांचे आजही पवार कुटुंबाबरोबर घट्ट नाते कायम आहे. शिंदे यांनी लावलेल्या या बॅनरची पंढरपूर शहर व परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.