Satara, 24 May : सातारा नगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून भाजपचेच मात्र खासदार उदयनराजे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटातील नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाला होता. खासदार उदयनराजेंनी त्याबाबत बैठकही घेतली होती. त्यात शिवेंद्रराजेंच्या नगरसेवकांबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी जाहिररित्या नगरसेवकांचे कान टोचले आहेत. ‘तुम्ही आघाड्यांचे नगरसेवक नाही, तर भाजपचे नगरसेवक आहात, हे लक्षात ठेवा’ असा इशारा त्यांनी आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांना दिला आहे.
सातारा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र स्टेट वेटरन्स स्पोर्ट असोसिएशन फॉर ऑल स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित ‘सातारा जिल्हा प्रीमियर लीग ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट (नाईट)’ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री शिवेंद्रराजे बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या. या स्पर्धेला ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे करंडक’ असे नाव देण्यात आले आहे.
ते म्हणाले, सगळे नगरसेवक इथं एवढ्या मोठ्या संख्येने आले आहेत, तर बनकरसाहेब सगळ्यांची एक मॅच घेऊन टाका. फक्त प्लेअर मिक्स करा. उगाच पहिल्यासारखं आघाड्या आघाड्याचं युद्ध नको. मी आणि महाराज (उदयनराजे भोसले) परवा मुंबईत होतो. आम्ही दोघांनीही तुम्हा सगळ्यांना सांगितलं आहे की, तुम्ही आता आघाड्यांचे नगरसेवक नाही, तर भाजपचे नगरसेवक आहात. तुम्ही सगळे आता एक आहात, आता त्या आघाड्या आणि पूर्वीचं सगळं विसरा.
पुढच्या पाच दिवसांत एक दिवसाची मॅच ठेवा, मी आणि उदयनराजे असं आम्ही दोघं येऊन बसतो, या ठिकाणी. पाहिजे तर आम्हाला अंपायर करा. कोणाला आऊट, नॉटआऊट, एखादा कच्च लिंबू वैगेरे म्हणून कोणाला खेळवायचं हे आम्ही दोघं ठरवतो. पण तुम्ही ग्राउंडच्या बाहेर काही करू नका, म्हणजे झालं.
पूर्वीचे सर्व मतभेद विसरून नगरपालिकेत विकासासाठी एकदिलाने काम करा, असा सल्लाही मंत्री भोसले यांनी भाजपच्या नगरसेवकांना दिला आहे. शिवेंद्रराजेंच्या या मूडची सातारा शहर आणि तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.