राजेंद्र त्रिमुखे
Ahmadnagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर बहुतांशी आमदार अजित पवार गटात गेल्याचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात काही मोजके आमदार असून त्यातही त्यांची भूमिका तळ्यात-मळ्यात अशी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मात्र साहेबांना पक्की साथ देत आक्रमक भूमिकेत पवार गटाची बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे.
रोहित पवार राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर प्रथमच आपल्या मतदारसंघातील कर्जत येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी एकूणच फुटीनंतर असलेल्या परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की 'एखादा आमदार ज्यावेळी आमदार होतो त्यावेळी तो साडेतीन-चार लाख लोकांचे प्रतिनिधित्व करत असतो.
ते प्रतिनिधित्व करत असताना एखाद्या आमदाराला धमकी देऊन मारून मुटकून जर कोणी घेऊन जात असतील तर तो त्या मतदारसंघावर कुठेतरी आघात असतो. तसाच तेथील मतदारांच्या स्वाभिमानावर तो आघात असतो. तो एक चांगला लोकप्रतिनिधी कधीही खपवून घेणार नाही, असे रोहित पवार म्हणाले.
जे आमदार शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडून गेले त्यांच्याबद्दल रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, असे आमदार केवळ स्वहितासाठी गेल्याचे दिसून येत आहे. त्यांनी विचारसरणीला बाजूला ठेवून लोकांनी दाखवलेला विचार बाजूला ठेवलेला दिसतोय. स्वहितासाठी सत्तेत ते जात असतील तर तो मतदारसंघातील लोकांच्या व्यक्तिगत स्वाभिमानावर हल्ला आहे आणि असा हल्ला मतदार कधीही विसरत नसतात.
त्यामुळे या दोन्ही भूमिका बघत असताना गेलेले आमदार फार काळ त्या बाजूला राहतील असे मला वाटत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्यावर्षी जून महिन्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अचानकपणे भाजपाने (BJP) शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांना फोडून आपल्याकडे वळवले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस युतीची सत्ता आली. या युती सरकारला दहाच्यावर अपक्षांचाही पाठिंबा असल्याने सत्तेसाठी आवश्यक असलेले मोठे संख्याबळ पाठीशी असतानाही पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षामध्ये भाजपाने फूट पाडली, असा आरोप त्यांनी केला.
गेल्या एक वर्षभरातील आतापर्यंतच्या सर्व घडामोडींचा विचार करता रोहित पवार यांनी आता शिंदे गटांमध्ये असंतोष निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. याबाबत ते म्हणाले की, अजून काही दिवस जातील मग शिंदे गटामध्ये नाराजी होईल. त्यानंतर भाजपा गटामध्येही नाराजी होईल. त्यामुळे काही विद्यमान मंत्र्यांना आपली मंत्रिपदे सोडावी लागतील. नवीन लोकांना त्याजागी घ्यावे लागेल. त्यानंतर नवीन लोकांना मंत्रिपदे दिल्यानंतर जे इच्छुक राहिलेत त्यांच्यामध्ये ही नाराजी दिसून येईल. या सर्व नाटकांमध्ये फक्त स्वहित दिसत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय.
आपला पक्ष सोडून गेलेले आमदारांनी स्वहित पाहिले आहे. मात्र, यामध्ये लोकांचा कोणताही विचार त्यांनी केलेला नाही. त्यामुळे मला महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना विनंती करायची सांगायचे आहे की जे काही चालले ते केवळ खुर्ची आणि स्वहितासाठी चालले आहेत. त्यामुळे जनतेत नाराजी आहे. यापुढे मुद्द्याचे बोला अशा हेतूने सरकारला प्रश्न विचारावे लागतील आणि आज ती वेळ आली असल्याचे रोहित पवार म्हणाले.
नुकतेच रोहित पवार यांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्या दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी नेत्यांवर समाज माध्यमातून साहेबांनी एवढे काही दिल्यानंतरही असा निर्णय घेतल्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यानंतर छगन भुजबळ यांच्यावरही आमदार रोहित पवार यांनी टीका केली. यावर भुजबळ यांनी रोहित पवारांचा जन्मही झाला नव्हता त्यावेळेस मी मुंबईचा महापौर होतो, असे म्हणत जास्त बोलला तर तुमच्या मतदारसंघत येऊन जाहीर सभा घेईल असा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी, कर्जत-जामखेड मतदारसंघसंघर्षाला महत्त्व देणार आहे. त्यांना येथील जनतेला कळले आहे की पवार साहेब जो संघर्ष लढत आहेत तो महाराष्ट्राच्या हितासाठी आणि पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आहे. त्यामुळे कर्जत-जामखेडची जनता माझ्या सोबतच राहील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. माझे कार्यकर्ते आणि पदाधिकारी येथील चुकीच्या विचारांच्या विरोधात लढतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.