तलाठी भरती परीक्षेच्या निकालाची पहिली गुणवत्ता यादी वादात अडकली असून परीक्षा रद्द करण्याची मागणी होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षेतील गैरप्रकाराचे पुरावे मागितले आहे, तर सरकारची बदनामी करण्यात येत आहे म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे, तर सरकार सत्तेला आपली जहागिरी समजते काय? सरकारची ही दडपशाही युवा मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. आम्ही युवा बाजूने लढत राहणार... भले काहीही कारवाई केली तरी बेहत्तर! असा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार Rohit Pawar यांनी दिला आहे.
राज्यात तलाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्यात साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यातील प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिला. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा समन्वय समितीने केला आहे. या परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी वादात अडकली आहे. इतर परीक्षांमध्ये ६० वर गुण मिळाले नाहीत, अशांना तलाठी परीक्षेत २०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
याशिवाय ज्यांच्यावर गुन्हे असलेल्या उमेदवारांची नावेही यादीत आली आहेत. यामुळे या परीक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. तसेच विरोधकांनी या परीक्षेच्या निकालावरून राज्य सरकारची कोंडी केली आहे. परीक्षेतील गैरप्रकारावरून सरकारवर आरोप सुरू केले आहेत. हे आरोप राज्य सरकारने फेटाळून लावले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तलाठी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सादर करावेत. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द करण्यात येईल, असे सांगितले आहे. तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विरोधक परीक्षेच्या निकालाबाबत दिशाभूल करीत आहेत. युवकांच्या जीवनाशी खेळत आहेत.
सरकारची बदनामी करत आहे. याबाबत बदनामीचे खटले दाखल करू. खुलासा करू. यावरदेखील बदनामी करत राहिल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या या दडपशाहीवर जोरदार टीका केली आहे. आमदार पवार यांनी त्यांच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विट) खात्यावर लागोपाठ दोन पोस्ट शेअर करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'पेपरफुटीविरोधात कठोर कायदा करण्याची वारंवार मागणी करूनदेखील सरकार तसा कायदा करत नाही. तलाठी भरती परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सादर करूनही त्याकडं दुर्लक्ष केले जाते. दुसरीकडे भरतीतील गैरव्यवहाराच्या बातमी देणाऱ्या पत्रकारांविरोधात हक्कभंग आणण्याची धमकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतात आणि गुन्हे दाखल करण्याची धमकी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे देतात.
यावरून हे सरकार सत्तेला आपली जहागिरी समजते काय? सरकारची ही दडपशाही युवा मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. आम्ही युवांच्या बाजूने लढत राहणार... भले काहीही कारवाई केली तरी बेहत्तर!' असे पहिल्या पोस्टमध्ये आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
यानंतर आमदार पवार यांनी थोड्या वेळाने पुन्हा पोस्ट केली. 'तलाठी भरतीचा पेपर फोडून गोरगरीब कुटुंबातील पोरांचे स्वप्न पायदळी तुडवणारे राजरोस फिरत आहेत अन् गृहमंत्री फडणवीससाहेब तुम्ही दोषींवर कारवाई करायचे सोडून या पोरांना पुरावे द्यायला सांगताय. हा 'चोराच्या उलट्या बोंबा,' असा प्रकार नाही का? की तुम्हाला तुमची खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी हा घोटाळा बाहेर येऊ द्यायचा नाही.
आज राज्यातील युवा तुमच्यातील सुपरफास्ट देवाभाऊला हाक देतोय आणि तुम्ही मात्र त्याला हात दाखवताय हे योग्य नाही. भरती परीक्षेसाठी हाजर रुपये वसुली करणारे तुम्ही... पेपर फोडणाऱ्यांना पाठीशी घालणारेही तुम्हीच... पोरांवर गुन्हे दाखल करण्याच धमकी देणारेही तुम्हीच... आणि पेपरफुटीचा पुरावा मागणारेही तुम्हीच... सरकारचा हा कसला अजब न्याय? देवाभाऊ... अजब तुमचे हे सरकार!' असे आमदार पवार यांनी म्हटले.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.