Karjat Jamkhed News : गेल्या वर्षभरात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांनंतर कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना एकापाठोपाठ राजकीय धक्के बसत आहेत. कर्जत-जामखेड तालुक्यातील त्यांचे अनेक कट्टर समर्थक, पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधींनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजप आमदार राम शिंदे यांच्या सोबत जाणे पसंत केले असल्याचे दिसून येत आहे. याच साखळीत आता मिरजगाव गटाचे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले आणि रोहित पवारांचे कट्टर समर्थक समजले जाणारे परमवीर पांडुळे आता भाजपच्या वाटेवर असल्याचे पुढे येत आहे. (Latest Marathi News)
आमदार रोहित पवारांना ग्रामपंचायत निवडणुकीनंतर एकापाठोपाठ एक धक्के बसू लागल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. रोहित पवार हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. मात्र, असे असूनही त्यांच्या हातून स्थानिक समीकरण सुटू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. आता तर रोहित पवार यांचे आणखी एक कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी आमदार राम शिंदे यांची भेट घेतली. मागच्याच आठवड्यात जवळा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सुशील सुभाष आव्हाड यांनी भाजपत प्रवेश केला होता.
जवळा ग्रामपंचायत ही स्थानिक आघाडीने जिंकली होती. सरपंच सुभाष आव्हाड यांनी राम शिंदे यांच्या उपस्थित भाजपत प्रवेश केला होता. युवा नेते प्रशांत शिंदे यांनीदेखील याच कार्यक्रमात भाजपत प्रवेश केला होता. तत्पूर्वी खर्डा गावातही आमदार रोहित पवारांना धक्का बसला होता. आता परमवीर पांडुळे यांनी भाजप आमदार राम शिंदे यांची भेट घेतली आहे. परमवीर पांडुळे हे मिरजगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. पांडुळे यांनी राम शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पांडुळे हे लवकरच भाजपत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रोहित पवार यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.
“आपला तो आपला, राम शिंदे यांनी सहकार्य केले. मात्र, मी त्यांची परतफेड करू शकलो नाही. या पुढे मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार,” असं परमवीर पांडुळे म्हणाले आहेत. त्यामुळे लवकरच एका मोठ्या कार्यक्रमात त्यांचा पक्षप्रवेश होईल, असे बोलले जातेय. 2019 ला रोहित पवार यांनी भाजपचे राम शिंदे यांचा धक्कादायक पराभव करत राम शिंदेंची विधानसभेची हॅटट्रिक चुकवली होती.
मात्र, त्यानंतर राम शिंदे यांना भाजपने विधान परिषदेवर घेत पुन्हा कर्जत-जामखेडमधून ताकत दिली. त्यानंतर 2019 नंतर रोहित पवार यांच्याकडे गेलेले अनेक जुने सहकारी परत एकदा राम शिंदेंकडे परतत आहेत. राज्यात मविआ सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राम शिंदे आणि पर्यायाने भाजपत इन्कमिंग वाढले असून, त्याचा फटका कुठेतरी रोहित पवार यांना बसत असल्याचे दिसत आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.