Mohan Bhagwat Sangali program sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dr.Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी सांगितलं, देशहितासाठी...

Umesh Bambare-Patil

Sangali : स्वातंत्र्य काळात लोकमान्य टिळक यांनी नेहमीच देशहित सर्वोतोपरी मानले. शरीर, मन आणि बुध्दी त्यांनी देशसेवेकरिताच खर्च केली. लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या माध्यमातून मागील 99 वर्षापासून जे उपक्रम सुरु आहेत ते टिळक विचाराचांच जागर करणारे आहेत. यापुढील काळातही ते निरंतर सुरु राहिले पाहिजेत. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आचरणात प्रथम देशहितच विचार स्वीकारला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

सांगली येथील लोकमान्य टिळक स्मारक मंदिरच्या शताब्दी वर्ष सोहळ्यास डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी प्रारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, संस्थेच्या अध्यक्षा मनिषा काळे, माधव बापट, प्रकाश बिरजे, माणिक जाधव, अमृता गोरे, विनायक काळे, श्रीहरी दाते, प्रकाश आपटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्या लोगोचे प्रकाशन करण्यात आले.

कोणत्याही व्यक्तीला जे महत्व प्राप्त होते ते त्याला मिळालेल्या स्थानामुळे असते. संघ स्वयंसेवकाच्या साध्या वर्तवणूकीचे अनेकांना नवल वाटते.परंतु संघाच्या कार्यपद्धतीतच याची शिकवण असते. सध्या शाखा, प्रशिक्षण वर्गातून स्वयंसेवकांची जडणघडण केली जाते.परंतु ज्या डॉ.हेडगेवारांनी संघ स्थापन केला त्यांनी कोठून शिक्षण घेतले असेल? असा प्रश्न मनात येतो. आपले ध्येय निश्चित करुन त्ते साध्य करण्यासाठी वाटचाल करणे आवश्यक आहे, असे सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले.

लोकमान्य टिळक यांनी आत्मियतेचे सूत्र जोपासले होते. त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केल्यास आपल्याला याचा प्रत्यय येतो. लोकमान्यांचे विचार हे राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक आहे. रामायण याचे वर्णन अमर कथेशी करण्यात येते. त्याचप्रमाणे राष्ट्राचे अमर आदर्श म्हणून ज्या व्यक्तिमत्वांची नावे घेण्यात येतात. त्यामध्ये लोकमान्यांचे नाव आवर्जून घेणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी सांगितले.

ध्येयाचा विसर पडू देवू नका

कोणतीही संस्था ज्यावेळी एखादा उपक्रम सातत्याने राबविते, त्यावेळी त्यामध्ये दोन गोष्टी होतात. एक म्हणजे सवयीने दिवसेंदिवस तो उपक्रम चांगला होतो. परंतु दुसरी बाब म्हणजे सवयीमुळे आपली विचार करण्याची शक्तीच संपुष्टात येते आणि आपण केवळ उपक्रम करतो. जसे सायकल दुहेरी स्टॅडवर लावून पॅडल मारले असता सायकल पुढे जात नाही. परंतु आपण सवयीने पॅडल मात्र सराईतपणे मारु शकतो.त्याच धर्तीवर आपल्याला ध्येयाचा विसर न पडता उपक्रमशील राहण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही सरसंघचालक भागवत यांनी केले.

संघटनेत आत्मियतेचे सूत्र आवश्यक

संघटनेत आत्मियतेचे सूत्र जोपासणे आवश्यक असल्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले. त्यामध्ये लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील एक आठवण प्रेरणादायी आहे. लखनौ येथे कॉग्रेसचे अधिवेशन होते. त्यास कार्यकर्ते उपस्थित होते. पहाटे चार वाजता टिळकांनी चूल पेटवून त्यावर मोठ्या हंड्यात पाणी तापायला ठेवले. हे लक्षात आल्यावर त्यांना काही कार्यकर्त्यांनी याबाबत विचारणा केली, त्यावेळी लो. टिळक यांनी, बाहेर थंडी असल्याने अधिवेशनातील कोणीही गार पाण्याने आजारी पडायला नको याकरिता पाणी गरम करत असल्याचे सांगितले. या उदाहरणातून कार्यकर्त्याप्रती असलेली त्यांची आपुलकी दिसते. त्याच आत्मियतेच्या सूत्राचे व्रत संघाने दैनंदिन आचरणातून जोपासले आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT