Ruturaj Patil vs Amal Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ruturaj Patil vs Amal Mahadik : कोल्हापूर दक्षिणमध्ये 'अमल-ऋतूराज' मध्येच बिगफाईट; विकासाचा मुद्दा ठरणार निर्णायक

Rahul Gadkar

Kolhapur News: राज्यातील निवडणुकीची घोषणा केंद्र निवडणूक आयोगाकडून होताच प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हाय व्होल्टेज समजली जाणारी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढत यंदाही विविध मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 'बंटी व मुन्ना' यांच्या राजकीय कट्टरतेमुळे हा मतदारसंघ राज्यात चर्चेचा विषय ठरतो. मात्र यंदाची निवडणूक ही बंटी मुन्ना नव्हे तर 'अमल -ऋतू' यांच्यातच गाजण्याची शक्यता आहे.

विविध विकासकामांच्या जोरावर आमदार ऋतुराज पाटील या निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर याच मतदारसंघातील समस्यांचा ढेर दाखवत विद्यमान आमदारांना कोंडीत पकडून अमल महाडिक निवडणुकीला सामोरे जात आहेत. यंदाच्या या निवडणुकीत भाजप नेते राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याकडून पडद्यामागील यंत्रणा सांभाळली जाणार आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यात सामना रंगणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ऋतुराज पाटील हे तब्बल 42 हजाराच्या मताधिक्याने निवडून आले होते. तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना केवळ 6 हजार 700 चे मताधिक्य मिळाल्याने काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे या मतदारसंघात भक्कम आहे. तर विरुद्ध बाजूने असणारे भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांचे देखील कार्यकर्त्यांची जाळी घट्ट आहे.

यंदाची निवडणूक आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक किंवा गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्यात होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडे विकास कामाबरोबर कार्यकर्त्यांचे मोठे जाळे, दलित वस्तीचे एकगठ्ठा मतदान हीच जमेची बाजू आहे. तर भाजपकडे विविध योजनेचे लाभार्थी, वाढलेली हिंदुत्वाची ताकद, कार्यकर्त्यांची वीण ही जमेची बाजू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. गत वेळी या मतदारसंघाची राज्यात चर्चा सुरू होती. मात्र यंदा दोन्ही बाजूंकडून प्रचाराची पातळी पहिल्यापासून डाऊन ठेवण्यात आली आहे.

हा मतदारसंघ शहरातील जवळपास 17 प्रभाग आणि शहरा शेजारी असणारा ग्रामीण भाग या मतदारसंघात येतो. शहरातील बहुतांश प्रभागात पाटील यांची ताकद आहे. तर महाडिक यांच्याकडे या प्रभागातील जनता आहे. शिवाय सरकारच्या विविध योजनेचे लाभार्थी भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडी मिळवली. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला सहा हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे वरकरणी जरी हा मतदारसंघ काँग्रेसच्या बाजूने वाटत असला तरी प्रत्यक्षात भाजपच्या उमेदवारावरच ही निवडणूक दिशा देणारी ठरणार आहे. असे चित्र दिसते.

आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांच्या वतीने दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदारसंघात निधी आणि विकास कामे संदर्भात माहिती देणारे पोस्टर लावले आहेत. तर माजी आमदार अमल महाडिक यांनी देखील सत्ताधारी सरकारच्या मदतीने मतदारसंघातील विकासकामे लक्षवेधी आहे. मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून या मतदारसंघातील आणि शहराच्या उपनगरातील समस्या जैसे थे अशाच आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील रस्ते, पाणी , कचरा व्यवस्थापन हे मूलभूत प्रश्‍न पूर्णपणे संपलेले नाहीत. त्यामुळे महाडिक यांच्याकडून मतदारसंघातील समस्या दाखवणारे दक्षिण प्रॉब्लेम हे फलक देखील झळकवण्यात आले होते.

गत वेळी भाजपला या मतदारसंघातून 42 हजाराच्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना लक्षवेधी मते मिळाली. गेल्या दोन वर्ष या मतदारसंघात भाजपने केलेली पक्षीय बांधणी महत्वपूर्ण मानली जाते. सध्या या मतदारसंघात दुरंगी लढत आहे. मात्र अपक्षांनी डोके या मतदारसंघात वर काढले आहेत. ते शेवटपर्यंत या रिंगणात राहतील पाहणे महत्त्वाचे आहे. पक्षांच्या चेहऱ्यावरच या निवडणुकीला महत्त्व प्राप्त होणार आहे. 2019 मधील लोकसभेतील व त्यानंतरच्या ‘गोकुळ’मधील पराभवाचे उट्टे काढण्याची संधी महाडिक साधणार की, पाटील गट पुन्हा बाजी मारणार याची उत्सुकता असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT