Karad, 25 August : कऱ्हाड पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाबाबत राजकारण केले जात आहे. पंचायत समितीचे सभापती, उपसभापतींना कार्यक्रमाला बोलावले जाते. मात्र, गणातील पंचायत समिती सदस्यांना कार्यक्रमाला बोलावले जात नाही, असा आरोप पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस नितीन थोरात, काँग्रेसचे रवींद्र बडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सिद्धार्थ चव्हाण यांनी केला. भाजपचे सदस्य धनाजी पाटील, राष्ट्रवादीचे संग्राम पवार यांनीही त्याबाबत आपल्या तीव्र भावना बोलून दाखवत यापुढे असे प्रकार होऊ नयेत, याची दक्षता घ्यावी, असे सुनावले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्ष सभापती नंदाताई यादव यांनीही अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे सभापती यादव यांनी सांगितले. उपसभापती अनिता वेताळ, गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह सदस्य व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे यांनी शिक्षण विभागाचा आढावा घेतला. त्याचवेळी सदस्य थोरात म्हणाले, माझ्या पंचायत समिती गणातील विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाला सभापती, उपसभापतींना बोलावण्यात आले होते. मात्र, मला त्या कार्यक्रमाचे निमंत्रणही नव्हते. त्यामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सदस्यांबाबत गटा-तटाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप केला.
सदस्य चव्हाण, बडेकर यांनी असे प्रकार यापूर्वीही झाल्याचे सांगितले. सदस्य धनाजी पाटील, संग्राम पवार यांनीही नाराजी व्यक्त करून असे प्रकार यापुढे घडू नयेत, अशी भूमिका मांडली. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी मोरे यांनी यापुढे असे होणार नाही, असे स्पष्ट केल्यावर वादावर पडदा पडला.
‘शिक्षण’ची बैठक हॉटेलमध्ये का घेतली?
शिक्षण विभागाच्या आढाव्यादरम्यान बैठक एका अलिशान हॉटेलमध्ये का घेण्यात आली, असा सवाल पंचायत समिती सदस्य नरेंद्र नांगरे-पाटील यांनी केला. कोणाच्या तरी सांगण्यावरुन ती बैठक घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. त्यावर गटशिक्षणाधिकारी मोरे यांनी यापुढे शाळेतच बैठक घेतली जाईल, असे स्पष्ट केले.
सभेपुरती आश्वासने देऊ नका....
पंचायत समिती, ग्रामसभांचे स्मार्ट मीटर न बसविण्याबाबत ठराव झाले असताना कर्मचारी वीज ग्राहकांच्या परस्पर जाऊन स्मार्ट मीटर का बसवत आहेत, असा सवाल सदस्यांनी केला. त्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर बसविणे कायद्यानुसार बंधनकारक असून त्या विरोधात ठराव करता येणार नाही असे सांगितले.
त्यावर आक्रमक झालेले सिध्दार्थ चव्हाण, रवींद्र बडेकर, नितीन थोरात, संग्राम पवार यांनी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्मार्ट मीटर सक्तीचे नसल्याचे सांगीतले. सभापती यादव यांनीही ७५ टक्के ग्राहकांना स्मार्ट मीटरमुळे जादा वीज बिले आल्याचा दावा केला. उपसभापती वेताळ यांनी वाढीव वीज बिलांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला. सभापती यादव यांनी ‘सभेपुरती आश्वासने देऊ नका, ग्राहकांना विचारात घ्या,’ अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.