Solapur, 09 May : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयाचे शिल्पकार आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. बाजार समितीमधील विजयाबद्दल या चौघांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. सभापतिपदाचा निर्णय हे मुख्यमंत्रीच घेणार असून शनिवारी (ता. 10 मे) रात्रीपर्यंत सभापती-उपसभापतींची नावे जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांचीही उपस्थिती होती. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची (Solapur Bazar Samiti) निवडणूक आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती. त्यांना माजी आमदार माने, हसापुरे आणि शिवदारे यांनी समर्थ साथ दिली होती. त्यांच्या पॅनेलने बाजार समितीत 13 जागा जिंकल्या आहेत.
कल्याणशेट्टी, माने, हसापुरे गटामध्ये सर्वाधिक जागा ह्या दिलीप माने गटाच्या आहेत. त्यामुळे माजी आमदार माने यांचे नाव सभापतीपदासाठी आघाडीवर असल्याचे समजते. मात्र, आजच्या भेटीनंतर हसापुरे यांचेही नाव चर्चेत आले आहेत. बाजार समितीसाठी पॅनेल ठरवताना दिलीप माने (Dilip Mane) यांना पहिली तीन वर्षे सभापतिपद देण्याचे ठरले होते. त्यानंतर दोन वर्षे ही इतरांसाठी देण्याचे सूत्र त्या वेळी ठरल्याचे सांगण्यात येत होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाजार समितीमधील विजयाबाबत पॅनेलप्रमुख कल्याणशेट्टी, माने, हसापुरे आणि शिवदारे यांचे अभिनंदन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार संस्थांमधील निवडणुकीमध्ये यापुढेही असेच एकत्रितपणे काम करा. मी तुमच्या पाठीशी आहे, असे फडसवीस यांनी या नेत्यांना शब्द दिल्याचे समजते. त्यामुळे बाजार समितीनंतर सहकारामधील इतर निवडणुकांमध्येही हे त्रिकूट एकत्रित काम करणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दरम्यान, सोलापूर बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती कोणाला करायचे, याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेणार आहेत. उद्या (शनिवारी, ता. 10 मे) रात्रीपर्यंत फडणवीस हे कल्याणशेट्टी यांना सभापती आणि उपसभापतीचे नाव कळविणार आहेत, त्यानंतर कल्याणशेट्ठी ही नावे जाहीर करणार आहेत, त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष उद्या कल्याणशेट्टी काय घोषणा करणार, याकडे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.