Sadabhau Khot
Sadabhau Khot sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'एकदा आमची पण गरीबी हटू द्या' ; सदाभाऊ खोतांची ठाकरे सरकारकडे अजब मागणी

सरकारनामा ब्युरो

सांगली : "माझ्या जावयाकडे सापडला तो गांजा नव्हे, ती हर्बल तंबाखू (Herbal Tobacco) होती, पण तो गांजा ठरवून एनसीबीने माझ्या जावयावर खोटे आरोप ठेवले आणि त्याला तुरुंगवास भोगावा लागला, असे विधान राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केले होते. त्यावरुन भाजपचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे अजब मागणी केली आहे, यावरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'नवाब मलिक याचे जावई समीर खान यांच्याकडे गांजा सापडला,' असा एनसीबीचा दावा आहे. त्यामुळे समीर खान यांना काही महिने तुरुंगाची हवा खावी लागली. सध्या त्यांना जामीन मिळाला आहे. या सगळ्याविषयी आपल्या जावयाची बाजू मांडताना आणि तो कसा निर्दोष आहे, हे सांगताना नवाब मलिक म्हणाले होते की, अमली पदार्थविरोधी पथकाला (एनसीबी) गांजा आणि हर्बल तंबाखू यांच्यामधील फरक कळत नाही याला काय म्हणावे. माझ्या जावयाकडे सापडला ती हर्बल तंबाखू होती, तो गांजा नव्हता. पण तो गांजा ठरवून एनसीबीने माझ्या जावयावर खोटे आरोप ठेवले आणि त्याला तुरुंगवास भोगावा लागला. केंद्रातील मोदी सरकार सुडबुद्धीने या छापेमारीच्या कारवाया करत आहे, असा आरोप मलिक यांनी केला होता.

मलिकांच्या या दाव्याची सदाभाऊ खोत यांनी खिल्ली उठवली आहे. आटपाडी (सांगली) येथील भाजपच्या मेळाव्यात खोत बोलत होते. "यंदा महाराष्ट्रभर हर्बल तंबाखूचा पेरा होऊ द्या, आम्हाला सरकारने हर्बल तंबाखूचे बियाणे द्यावे, एकदा आमची पण गरीबी हटू द्या," अशी उपरोधात्मक मागणी खोत यांनी केल्यानं उपस्थितांमध्ये हशा पिकला. "नवाब मलिक यांच्या जावयाकडे गांजा सापडला, पण महाविकास आघाडी सरकारने ती हर्बल तंबाखू होती असे सांगितले," असा टोमणा खोतांनी ठाकरे सरकारला लगावला.

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सदाभाऊ खोत यांनी भाष्य केलं. 'मी पुन्हा येईन, हे वाक्य आपल्याला खरं करायचं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे. हे लोक त्यांच्या वाक्याची खिल्ली उडवतात. मात्र शेतकऱ्यांचा दुष्काळ हटवण्यासाठी, त्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आणि बारा बलुतेदारांना न्याय देण्यासाठी, मी पुन्हा येईन, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं,' अशा शब्दांत खोतांनी फडणवीसांचं समर्थन केलं आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेही यावेळी उपस्थित होते. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला, आता महाविकास आघाडीतील नेते याला काय प्रत्युत्तर देतात हे लवकरच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT