Sadabhau Khot - Raju Shetti, Dhairyasheel Mane  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sadabhau Khot News : सदाभाऊ खोतांनी मोठा डाव टाकला; खासदार धैर्यशील माने अन् राजू शेट्टींचं टेन्शन वाढवलं

Deepak Kulkarni

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचे जागावाटप महायुतीमधील पक्षांनुसारच होणार असल्याचे संकेत दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार शिंदे गटाच्या शिवसेनेचे आहेत. त्यामुळे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने लोकसभा निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार असणार असल्याच्या महाडिकांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगली होती.

अशातच धैर्यशील माने (Dhaniryasheel Mane) यांनी देखील आपण २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलून दाखवले आहे. याचवेळी आता माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून २०२४ ची निवडणूक लढविणार असल्याबाबत सूचक विधान केलं आहे.

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी शिंदे गटाचे खासदार धैर्यशील मानेंच्या हातकणंगले मतदारसंघाबाबत मोठं विधान केलं आहे.

खोत म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जागा रयत क्रांती संघटना लढवणार असून आपण स्वतः उमेदवार असणार आहे. २०१९ च्या निवडणुकीसाठी विद्यमान खासदार यांच्या विजयासाठी आम्ही जीवाचं रान केले होते. गेल्या निवडणुकीतील मदतीचा पैरा खासदार धैर्यशील माने यांनी फेडावा, असे आवाहन माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून गेल्यावेळी आपण निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. त्यादृष्टीने मतदारसंघही पिंजून काढला होता. एकप्रकारे जमिनीची मशागतच आपण केली होती. परंतू, पक्षादेशानुसार आपण महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्यामागे सर्व ताकद लावून त्यांना निवडून आणले, परंतू, आता आपण स्वतः या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून हा मतदारसंघ रयत क्रांतीला सोडावा अशी मागणी करणार आहे, असे खोत यांनी स्पष्ट केले आहे.

खोत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकत २०२४ ला खासदारकी लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचं (Raju Shetti) टेन्शन वाढवलं आहे.

'एनडीए'च्या बैठकीपासून खोत दूरच...

भाजपने एनडीएची महत्त्वाची बैठक जुलै महिन्यात बोलावली होती. त्यात महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार गट यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

तसेच आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष, रामदास आठवले यांचा आरपीआय (आठवले गट) यांनाही बैठकीचं निमंत्रण आले होते.पण याचवेळी राज्यात भाजपचे मित्रपक्ष असलेले सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटना, महादेव जानकर यांचा रासप, दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाला एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT