Manoj Ghorpade - Balasaheb Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Politics : ज्या सह्याद्रीकडे बघून 'घोरपडेंनी' शड्डू ठोकला होता, तिथंच 'बाळासाहेबांची' झोकात एन्ट्री...

Karad Politics : भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी सह्याद्री सहकारी कारखान्याकडे बघून शड्डू ठोकतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना आव्हान दिले होते.

Hrishikesh Nalagune

Karad Politics : भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी सह्याद्री सहकारी कारखान्याकडे बघून शड्डू ठोकतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना आव्हान दिले होते. आता त्याच कारखान्यात पाटील यांनी अगदी झोकात प्रवेश करत पुन्हा अध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान झाले आहेत. कारखान्याच्या संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक झाली. त्यात अध्यक्षपदी बाळासाहेब पाटील, तर उपाध्यक्षपदी कोरेगावचे माजी उपसभापती कांतिलाल भोसले-पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर मतदारसंघातून मनोज घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्यानंतर निघालेल्या विजयी रॅलीमध्ये घोरपडे यांनी उत्तर भागाची कामधेनु समजल्या जाणाऱ्या सह्याद्री सहकारी कारखान्याकडे बघून शड्डू ठोकला होता. त्यातून बाळासाहेब पाटील यांना दुसरे आव्हान दिल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर काहीच दिवसात कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने कारखान्याची सत्ता अबाधित राखण्याचे आव्हान पाटील यांच्यासमोर होते.

अशात सुरुवातीला सर्व विरोधक एकवटले होते. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी विरोधकांच्या एकीला सुरुंग लागला आणि तिसरे पॅनेल तयार झाले. त्यानंतरही पाटील यांनी हे आव्हान लिलया पेलले. विरोधातील दोन्ही पॅनेलचा धुव्वा उडवत 21-0 असा दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या संचालकांच्या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड झाली. यात अध्यक्षपदी बाळासाहेब पाटील, तर उपाध्यक्षपदी कांतिलाल भोसले-पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

निवडीनंतर अध्यक्ष पाटील म्हणाले, "सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांकडून अपप्रचार करण्यात आला. काही खोट्या घोषणाही केल्या. कारखान्याच्या कर्जाबाबत अपप्रचार पसरवला, खालच्या पातळीवर टीका झाली, त्याला सभासदांनी निवडणुकीच्या माध्यमातून मतांच्या रूपाने समर्पक उत्तरे दिली आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून जो विश्वास सभासदांनी दाखवला, त्यास पात्र राहून चांगल्या प्रकारचे काम करू, असेही आश्वासन पाटील यांनी दिले.

'सह्याद्री' ची राज्यभर चर्चा :

सह्याद्री सहकारी कारखान्याच्या निवडणुकीची संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू आहे. ईव्हीएम मशिनवरील आक्षेपांमुळे 'बॅलेट पेपर'वर मतदान करण्याची मागणी पुन्हा समाजमाध्यमांवरून जोर धरू लागली आहे. राज्यभरातून नागरिकांची अस्वस्थता व्यक्त होत आहे. पारदर्शकतेसाठी सर्वसामान्य निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे, संजय राऊत यांनीही मते स्पष्टपणे मांडली असून, निवडणूक प्रक्रियेबाबत नव्याने विचार होण्याची गरज अधोरेखित केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT