Sangli Maratha Reservation News : सांगलीमधील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषणस्थळी भेट दिली.
या वेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्टपणे मांडली, शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही मोठं विधान केलं. ज्यावरून आता विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना संभाजी भिडे म्हणाले, ''साधी गोष्ट आहे, पंगत बसलेली आहे. पंगतीत ९० पानांवर वाढलेलं आहे, पण दहा पानांवरती वाढलं नाही. इतका साधा प्रश्न आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं का नाही, हा चर्चेचा मुद्दा असू शकत नाही. ते मिळणार का? उद्या सूर्य उगवणार का, त्याचं जे उत्तर आहे, तेच आहे. १०० टक्के होणार.''
''हा प्रश्न रेंगाळला लांबला. आपण सगळे कुठलाही पक्ष, पंथ, सांप्रदायातील असू आपण शेवटी एक आहोत. एक आहोत म्हणजे हिंदुस्थान म्हणून एक आहोत. या हिंदुस्थाचा प्राण महाराष्ट्रात आहे, महारष्ट्रात आहे म्हणजे मराठा समाजात आहे, तर ही समस्या १०० टक्के सुटणार आहे. हे लांबलं याचं कारण, मी स्वत:लाच म्हणून घेतो माझ्यासारखे राजकारणी लबाड लोक आहेत. हे चिघळताच कामा नये.''
याचबरोबर ''जरांगे पाटील यांनी लक्षात घेतलं पाहिजे, की उद्या सूर्योदय होणार आहे. लहान लेकराला चालायला शिकवताना, आई त्या ताहन्या बाळाच्या पावलाप्रमाणे पाऊल टाकते. तसं थोडं आपण लक्षात घेतलं पाहिजे, की होणार आहे १०० टक्के होणार आहे. आणि याचं नेतृत्व जरांगे पाटलांकडेच राहिलं पाहिजे. याची काळजी घेतली पाहिजे. माझ्यासारखे आत एक बाहेर एक असले, राजकारणी लोक यामध्ये नको,'' असंही भिडे यांनी सांगितलं.
तसेच ''पण भगवंताच्या कृपेने अपवाद असतो. आताचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. मी कुठल्या पक्षात नाही, पण ते कलम बी काय आहे ते मला माहीत आहे. देवेंद्र फडणवीस राजकारणात असेल, पण देवेंद्र काय आणि एकनाथराव काय ही दोन्ही माणसं राजकारणाच्या पलीकडे देशाचाच विचार करून जगणारी आहेत. हे पक्क लक्षात ठेवा. ही माणसं बनवणार नाहीत. लबाडीने बोलणार नाहीत, स्वत:चं हातचं राखून चालणार नाहीत. आपण चालत राहूया लवकरात लवकर हे सुटेल,'' अशा शब्दांत भिडे यांनी आपली भूमिका मांडली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.