Sambhijaraje Chhatrapati, Eknath Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sambhaji Chhatrapati News : संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्री शिंदेंना पाठवलं विशेष पत्र, आता केली आहे 'ही' मागणी!

Mayur Ratnaparkhe

Sambhijaraje Chhatrapati on Vishalgad Encroachment : विशाळगडाला संपूर्णत: अतिक्रमण मुक्त करून गडाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आवश्यक त्या योजना राबवाव्यात याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज(गुरुवार) पत्र पाठविले. याबाबत त्यांनी स्वत: माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना पाठवलेल्या पत्रात संभाजीराजे छत्रपती म्हणातात, 'रविवार, दि. १४ जुलै २०२४ रोजी किल्ले विशाळगडच्या पायथ्याला उपस्थित हजारो शिवभक्तांच्या मागणीची दखल घेऊन आपण किल्ले विशाळगडवरील अतिक्रमणे दुसऱ्याच दिवशी पासून हटविण्याची ग्वाही दिली. आपण दिलेल्या शब्दानुसार मागील चार दिवसांत शंभरहून अधिक अतिक्रमणे हटविली आहेत, याबद्दल सर्व शिवभक्तांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो!'

तसेच, 'ही कार्यवाही न थांबविता उर्वरित सर्व अतिक्रमणे देखील वेळेत हटविण्यात यावीत. तसेच, विशाळगड सहित इतर कोणत्याच गडकोटांवर अशी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे होऊ नयेत, आपल्या देशाची शान असणाऱ्या गडकोटांची अस्मिता जपली जावी, त्यांचे पावित्र्य राखले जावे याबाबत सरकारने कटाक्षाने खबरदारी घ्यावी.'

याशिवाय 'गेल्या काही दशकांत झालेल्या या अतिक्रमणांमुळे किल्ले विशाळगड व गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे अतोनात नुकसान झालेले आहे. हे नुकसान भरून काढून गडाचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक बाबींची भरीव तरतूद करावी. काळाच्या ओघात अथवा जाणीवपूर्वक लपविण्यात आलेले ऐतिहासिक अवशेष उजेडात आणण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभागामार्फत विशाळगडावर उत्खनन करण्यात यावे.' अशी मागणीही संभाजीराजे छत्रपतींनी(Sambhaji Chhatrapati) केली.

Sambhijaraje Chhatrapati letter to Chief Minister Eknath Shinde

याचबरोबर ' विशाळगड हे धार्मिक अथवा पर्यटनस्थळ नसून आपल्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारे ऐतिहासिक प्रेरणास्थळ आहे. विशाळगडचे हे महत्त्व जपण्यासाठी व भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्याच्या इतिहासात असणारे या गडाचे अढळ स्थान अधोरेखित करणाऱ्या आवश्यक त्या योजना राबवाव्यात.

गडावर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी संपूर्ण गडावर सीसीटिव्ही कॅमेरे व नियमित पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. या सर्व बाबींवर विचार करून शासनाने तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी व संबंधित सर्व विभागांना योग्य ते निर्देश द्यावेत, ही विनंती !' असं संभाजीराजे छत्रपती यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT