suresh khade, sanjay patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanagli Loksabha : सुरेश खाडे, संजयकाकांचे महापालिकेतून 'मिशन इलेक्शन'; लोकप्रतिनिधी नसल्याने कामांचा लावला सपाटा

सरकारनामा ब्यूरो

अनिल कदम

Sangali News : लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून पोहोचल्याने राजकीय घडामोडी वाढत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोमात तयारी सुरु असताना खासदार संजयकाका पाटील आणि पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विकासकामांचा आढावा घेत आहेत.

महापालिकेत सध्या प्रशासकराज सुरु असल्याने पदाधिकारी व नगरसेवकांचा हस्तक्षेप थांबला आहे. याचा फायदा भाजपने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. विकासकामांच्या माध्यमातून खासदार पाटील हे लोकसभेची तर पालकमंत्री खाडे यांच्याकडून मिरज विधानसभा मतदारसंघाची तयारी करीत आहेत. दोन्ही नेत्यांनी महापालिकेच्या माध्यमातून उर्वरित कामांचा सपाटा लावून प्रत्यक्षात निवडणुकीचे टार्गेट निश्चित केल्याचे दिसून येते.

आगामी लोकसभा निवडणुकांची भाजपकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांची दुसरी टर्म सुरु आहे, असे असले तरी खासदार संजयकाका यांच्याबद्दल पक्षांतर्गत नाराजी आहे. निवडणुकीच्या तापणार्‍या राजकीय वातावरणात सगळेच पक्ष गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. भाजपची जागा निश्चित असली तरी या जागेसाठी भाजपमध्येच चढाओढ सुरु झाली आहे.

या पार्श्वभूमीवर संजयकाका पाटील विकासकामांसाठी अधिकच आक्रमक झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून कामांचा सपाटा लावला आहेच. केंद्रिय मंत्र्यांना भेटून जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. सलगरे लॉजिस्टिक पार्क मंजुरीसह आणि जिल्ह्यातील वाहतुकीच्या मार्गाबद्दल थेट नितीन गडकरी यांची भेट घेतली. याशिवाय रेल्वे मार्ग, म्हैसाळ योजनेची विस्तारित मंजुरीसह कोयनेतून सांगली जिल्ह्याला पाणी सोडण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

सांगली-मिरज रस्त्यावरील कृपामाई जवळील रेल्वे पूल अचानक बंद करण्याबाबतचे पत्र रेल्वे विभागाने दिल्याने अधिकार्‍यांची खरडपट्टी केली. अचानक मार्ग बंद करणे उचित नसल्याचे सांगत लोक अंगावर धावून येतील, असेही बजावले होते. कोणत्याही परिस्थितीत तात्काळ रेल्वे पूल बंद न करता पर्याय सुचविण्याचे आदेश खासदारांनी दिले आहेत. जिल्ह्यातील प्रश्न हाताळत असताना खासदारांनी आपला मोर्चा सर्वाधिक शहराचे सर्वाधिक मतदान असलेल्या महानगरपालिकेकडे वळविला आहे.

महापालिका क्षेत्रात सध्या प्रलंबित असलेल्या योजना व नव्याने आखलेल्या योजनांना गती देण्यासाठी भाजपचे आमदार, खासदार मनपात लक्ष घालणार आहेत. महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक सन 2018 मध्ये झाली होती. या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. पण अडीच वर्षानंतर महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपमधील काही नगरसेवकांनी पक्षाशी गद्दारी करून काँग्रेस-राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. आता महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. पदाधिकारी व नगरसेवकांची मुदत ऑगस्टमध्ये संपली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार, खासदारांना करावा लागणार पाठपुरावा

गेल्या पाच महिन्यापासून महापालिकेत प्रशासकांच्या माध्यमातून कारभार सुरु आहे. आयुक्त सुनील पवार यांच्याकडे प्रशासकांची सूत्रे आहेत. महापालिकेच्या निवडणुका किमान सहा महिने तर होणार नाहीत. त्यामुळे भाजपने आता महापालिकेत लक्ष घालण्यात सुरूवात केली आहे. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्याचा फायदा भाजपचे आमदार व खासदार घेणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून मनपा क्षेत्रात विविध योजना सुरू आहेत. या योजनांसाठी निधी आवश्यक आहे. शिवाय नव्याने राबविण्यात येणार्‍या योजनांना देखील निधी आवश्यक आहे. त्यासाठी आता पदाधिकार्‍यांऐवजी आमदार व खासदारांना पाठपुरावा करावा लागणार आहे.

मनपा क्षेत्रातील अनेक कामे प्रलंबित

महानगरपालिका क्षेत्रात खासदार संजयकाका पाटील (Sanjay patil), मिरजेचे आमदार व पालकमंत्री डॉ. खाडे, आणि सांगलीचे आ. सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) हे येतात. या सर्वांनीच महापालिकेच्या कारभारामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे. चार दिवसांपूर्वी पालकमंत्री खाडे यांची बदली कामगारांनी भेट घेतली होती. मनपाकडून राबविण्यात येणार्‍या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना कायम करावे, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. शिवाय मनपा क्षेत्रातील अनेक प्रलंबित कामे आहेत. याबाबत त्यांनी बैठक घेवून अधिकार्‍यांशी चर्चा केली. ते पुन्हा विकासकामांसाठी बैठक घेणार आहेत.

महापालिका क्षेत्रात खासदारांचा गट नसला तरी बहुतांशी माजी नगरसेवक त्यांच्या संपर्कात असतात. आता पदाधिकारी आणि नगरसेवक नसल्याने त्यांचा हस्तक्षेप थांबला आहे. त्यामुळे अधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत. महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय नव्याने निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महापालिकेच्या योजनांना गती मिळावी व शासनस्तरावरील प्रस्तावांचा पाठपुरावा व्हावा, यासाठी खासदार सरसावले असल्याचे चित्र दिसून येते.

(Edited by : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT