Sangli Nnews : सांगली शहराचे तत्कालीन काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना भाजपने गळाला लावल्यानंतर काँग्रेस शहराध्यक्ष पद रिक्त झाले होते. त्याला चार ते पाच महिने उलटूनही काँग्रेसच्या शहराध्यक्षपदावर कोण बसणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली होती. मात्र त्यावर खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्यात आपलाच व्यक्ती या पदावर बसवायचा. अशी अंतर्गत स्पर्धा लागल्याची चर्चा होती. जिल्ह्यातील दोघां नेत्यांचे एका नावावर एकमत होत नसल्याचे सांगितले जात होते.
अखेर आमदार विश्वजित कदमांवर वरचढ ठरत खासदार विशाल पाटील यांनी सुचवलेल्या राजेश नाईक यांना सांगली काँग्रेसचे शहराध्यक्ष पद देण्यात आले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ यांच्या आदेशाने प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड, गणेश पाटील यांनी निवडीचे पत्र जाहीर केले.
राजेश नाईक हे विद्यार्थी दशेपासून राजकारणात सक्रिय आहेत. ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. 2005 साली नगरसेवक झाले. पुढे तीनवेळा नगरसेवक आणि एकवेळ स्थायी समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. दिवंगत मदन पाटील समर्थक म्हणून राजकारणात त्यांनी काम केले आहे. शहर जिल्हाध्यक्षपदासाठी खासदार विशाल पाटील यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आणि आमदार विश्वजीत कदम यांनीही त्याला संमती दर्शवली. पृथ्वीराज पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले होते.
या जागेवर कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राजेश नाईक यांच्यासह मंगेश चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते. आमदार कदम यांच्या गोटातून चव्हाण यांनी ताकद लावली होती. खासदार विशाल पाटील यांनी नाईक यांची शिफारस केली होती. या पदावर ज्येष्ठ माजी नगरसेवक नेमला जाईल, असे विश्वजीत यांनी स्पष्ट केले होते. या शर्यतीत राजेश नाईकांनी बाजी मारली. गेल्या तीन महिन्यांपासून या निवडीची प्रतिक्षा होती. दोन्ही नेत्यांकडून एका नावावर सहमती दर्शवली जावी, यासाठी प्रदेश प्रतिक्षेत होता. अखेर महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर नाईक यांचे नाव निश्चित झाले आणि आज घोषणा झाली.
मी काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला या पदावर संधी देऊन पक्षाने सन्मान केला आहे. पक्षाचा विचार प्रभावीपणे लोकांसमोर पोहोचवणे आणि काँग्रेसला पुन्हा ताकदीने बांधण्याचे काम मी करेल. आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पुन्हा नव्या दमाने उभी राहील. आगामी निवडणुकीत पक्ष चांगली कामगिरी करेल." अशी प्रतिक्रिया नूतन काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.