Gopichand Padalkar
Gopichand Padalkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आटपाडी राडा प्रकरण : गोपीचंद पडळकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला..

सरकारनामा ब्यूरों

सांगली : एसटी आंदोलनात सहभागी झालेले आमदार गोपीचंद पडळकर यांच्यापुढील अडचणी वाढत असून त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात त्यांना आता कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसून येत आहे.

जिल्हा बॅंक निवडणुकीच्या नाट्यात आटपाडी राडा प्रकरण घडले. त्यात आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तानाजी पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्याविरोधात अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयात त्यांनी धाव घेतली. त्या अर्जावर सुनावणी झाली असून, त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. व्ही. जगताप यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

आमदार पडळकर यांच्या अर्जाच्या सुनावणीसाठी सरकार पक्षातर्फे रियाझ जमादार, तर बचाव पक्षाकडून प्रकाश जाधव यांनी काम पाहिले; तर पाटील यांच्याकडून सरकार पक्षातर्फे ए. एन. कुलकर्णी, तर बचाव पक्षाकडून दीपक शिंदे यांनी काम पाहिले. 

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत आटपाडीत झालेल्या या राड्यामुळे तणावाचे वातावरण आहे. आमदारांनी अंगावर गाडी घालून ठार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राजू जानकर यांनी केला. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करीत गाडीची तोडफोड केली. त्यानंतर परस्परविरोधी फिर्यादी दिल्या. दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. आमदार पडळकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा, तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तानाजी पाटील यांच्यावरही बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडून आटपाडी तालुक्यात छापेमारी करण्यात आली. आमदार पडळकर, तानाजी पाटील, ‘राष्ट्रवादी’चे राजू जानकर यांची आलिशान चार वाहने जप्त केली. त्यानंतर आमदार पडळकर आणि तानाजी पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. त्यावर आज सुनावणी झाली व न्यायालयाने अर्ज फेटाळला. दरम्यान, ‘एलसीबी’चे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह उपनिरीक्षक महंमद रफीक शेख, महादेव नागणे, सचिन कनप, मच्छिंद्र बर्डे, संदीप गुरव, सविता माळी यांच्या पथकाचा मोठा बंदोबस्त न्यायालय परिसरात होता. 

आटपाडीत छापेमारी 

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे देण्यात आला आहे. चार दिवसांपासून आटपाडी आणि परिसरात छापेसत्र सुरू आहे. आज न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यावर ‘एलसीबी’सह पोलिसांची जादा कुमक आटपाडी तालुक्यात तैनात करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT