R. R. Patil- sanjay Patil
R. R. Patil- sanjay Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आरआर आबांचा गट पराभवाचा वचपा काढणार की संजयकाका पुन्हा बाजी मारणार?

रवींद्र माने

तासगाव (जि. सांगली) : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील आणि खासदार संजय पाटील यांच्या गटामध्ये तडजोडीचे राजकारण सुरू आहे, या टीकेची शहानिशा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे सोसायटी गटाच्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सोसायटी गटातून खासदार संजय पाटील यांनी मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का दिला होता. आर. आर. आबांचा गट मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढणार की राष्ट्रवादीतील गटबाजीचा फायदा पुन्हा खासदार संजयकाका उचलणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. (Sangli District Bank Election : R. R. Patil's group and Sanjaykaka's group will come face to face)

तासगाव तालुक्यात सांगली जिल्हा बॅंकेच्या सोसायटी गटासाठी ८० मतदार आहेत. त्यासाठी तिरंगी लढत सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बी. एस. पाटील, भाजपचे सुनील जाधव आणि अपक्ष म्हणून डॉ. प्रताप पाटील मैदानात उतरले आहेत. पाच वर्षांपूर्वी मागील निवडणुकीत अपक्ष डॉ प्रताप पाटील यांनी राष्ट्रवादी च्या सतीश पवार यांना खासदारांच्या आशीर्वादाने पराभूत करत धक्का दिला होता. राष्ट्रवादीची मते फोडून खासदार संजयकाका पाटील यांना आबा गटाला शह देण्यात यश मिळाले होते. मात्र या वेळी भाजपने खासदार पाटील यांचे समर्थक, पंचायत समिती सदस्य सुनील जाधव यांना निवडणुकीत उतरवले आहे. त्यामुळे डॉ. प्रताप पाटील यांच्यापुढे अडचणी वाढल्या आहेत. पण अटीतटीच्या या लढाईत आबा आणि काका गटाच्या तडजोड आणि सलोख्याच्या चर्चेचे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होणार आहे.

आर. आर. आबांच्या निधनानंतर तासगाव मतदारसंघात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील हाणामारी वगळता राजकीय शांतता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील हातमिळवणीनंतर दोन्ही गटावर समझोत्याच्या राजकारणाची टीका होत आहे. या टिकेला जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत उत्तर मिळेल, अशी अपेक्षा आहे.

खासदार संजय पाटील स्वतः या वेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक रिंगणात नाहीत, त्यामुळे त्यांना किमान आपले समर्थक तरी बँकेत पाठविण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत. तासगाव तालुक्यातील सोसायटी गटातील सध्याचे बलाबल पाहता राष्ट्रवादीचे पारडे जड वाटत असले तरी राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत धुसफूस नेहमीप्रमाणे डोके वर काढू लागली आहे. याच धुसफूशीचा फायदा मागील निवडणुकीत खासदार संजयकाकांनी घेऊन आमदार पाटील गटाची एक जागा कमी करण्यात यश मिळविले होते. आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होते का राष्ट्रवादी आपली जागा पुन्हा खेचून घेणार, याबाबत उत्सुकता आहे. शिवाय, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी जवळीक वाढलेल्या खासदार संजयकाका पाटील यांच्या भूमिकेकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT