BJP MLA Suresh Khade and Pooja Patil’s nominations Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँकेत भाजप आमदार सुरेश खाडे रिंगणातून बाहेर, खासदार विशाल पाटील यांच्या पत्नीचाही अर्ज बाद

Sangli District Bank election scrutiny invalidated BJP MLA Suresh Khade and Pooja Patil’s nominations: सांगली जिल्हा बँक निवडणुकीत छाननीदरम्यान आमदार सुरेश खाडे आणि पूजा पाटील यांचे अर्ज बाद झाले. विशाल पाटील, गोपीचंद पडळकर आणि सत्यजित देशमुखांचे अर्ज वैध ठरले.

Rahul Gadkar

Sangli District Bank Election: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये मातब्बर नेत्यांना दणका बसला आहे. माजी मंत्री, भाजप आमदार सुरेश खाडे आणि काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांचे अर्ज बाद झाले आहेत. त्याचवेळी विशाल पाटील, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सत्यजित देशमुख यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांची पडळकर यांच्या अर्जावरील हरकत मान्य झाली नसल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक १ नोव्हेंबरला होणार असून, यंदा विक्रमी ३५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी अर्ज छाननीची प्रक्रिया तब्बल नऊ तास चालली. खासदार, आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अर्जांवर हरकती दाखल झाल्याने या प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहकार उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी छाननी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंगळवारी सकाळी निकाल जाहीर केला.

खाडेंचा अर्ज अवैध

सुरेश खाडे यांच्या उमेदवारीवर अण्णासाहेब कोरे आणि मोहन वनखंडे यांनी हरकत घेतली होती. सहकारी संस्थेचे दोन वर्षांचे सभासदत्व नसतानाही उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर केल्याचा आक्षेप त्यांच्याकडून घेण्यात आला होता. छाननीनंतर खाडे यांचा अर्ज अवैध ठरला आहे.

पूजा पाटील यांचा अर्जही अवैध

खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांच्या अर्जावरही हरकत घेण्यात आली होती. सहकारी संस्थेत दोन वर्षे सभासद नसतानाही त्यासंदर्भातील दाखला जोडल्याचा आरोप करण्यात आला होता. छाननीनंतर त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. मात्र, पूजा पाटील महिला गटातून निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

पडळकरांचा अर्ज वैध; सावंत न्यायालयात जाणार

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अर्जावर माजी आमदार विक्रम सावंत आणि सुजय शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. कुणीकोणूर सोसायटीचे दोन वर्षांचे सभासदत्व तसेच निंबवडे पतसंस्थेतील संचालकपदाचा अनुभव यासंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. लेखापरीक्षण अहवालातील सभासदांच्या यादीत पडळकर यांचे नाव नसल्याचा दावा करत त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पडळकर यांचा अर्ज वैध ठरवला आहे. दरम्यान, या वैधतेला माजी आमदार विक्रमसिंह सावंत न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले आहे.

देशमुखांचा अर्जही वैध

आमदार सत्यजित देशमुख यांच्या अर्जावर आप्पासाहेब पाटील आणि रघुनाथ पाटील यांनी हरकत घेतली होती. सहकारी संस्थेतील कर्जाची थकबाकी असल्याचा, तसेच बँकेची थकबाकी असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, छाननीनंतर सत्यजित देशमुख यांचा अर्ज वैध ठरला आहे.

विशाल पाटील यांच्यावरील हरकत फेटाळली

खासदार विशाल पाटील यांच्या अर्जावर सुरेश खाडे समर्थक तानाजी पाटील यांनी हरकत घेतली होती. सलग दहा वर्षे संचालक असल्याने नवीन सहकारी कायद्यानुसार त्यांना निवडणूक लढवता येणार नसल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, छाननीनंतर विशाल पाटील यांचा अर्ज वैध ठरला.

हरकतींमुळे नऊ तास छाननी

उमेदवारी अर्जांवर हरकती दाखल झाल्याची माहिती मिळताच खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह संबंधित नेत्यांचे समर्थक आणि वकिलांचे पॅनेल बँकेत दाखल झाले होते. कागदपत्रांची तपासणी, सहकार कायद्यातील तरतुदी आणि नव्या नियमांवर दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT