Sangli jillha Bank election sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

District Bank Election : सांगली जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट! शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीच्या आमदाराची माघार, सुमन पाटलांची रणनीती

Idris Naikwadi Suman Patil Withdrawal Sangli Bank Election : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडूनही जोरदार हालचाली सुरू झाल्या असून नेत्यांची बैठक सुरू आहे.

Aslam Shanedivan

Sangli Bank Election Political Twist News : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू असून, निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष मतदानाची वेळ येणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. आज (२१ ऑक्टोबर) दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

दिग्गज उमेदवारांमुळे निवडणुकीत चुरस

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आजी-माजी खासदार, चार विद्यमान आमदार, जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष, एक माजी राज्यमंत्री, जिल्हा परिषदेचे तीन माजी अध्यक्ष आणि दोन माजी महापौर मैदानात उतरले आहेत. एकीकडे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अनेक दिग्गजांनी उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

या निवडणुकीसाठी संचालक मंडळाच्या जागांवर एकूण २६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अ गट अर्थात विकास सोसायटी गटात ७७८ मतदार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील एकूण मतदारसंख्या २ हजार ४४५ आहे. यामध्ये वाळवा तालुक्यात सर्वाधिक ५८४ मतदार असून, त्यानंतर मिरज तालुक्यात ४५१ मतदार आहेत.

इद्रिस नायकवडींची माघार; नेत्यांच्या बैठकीनंतर निर्णय

दरम्यान, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्ज माघारीपूर्वी त्यांची जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.

सुमन पाटील यांची महिला राखीव गटातून माघार

सुमन पाटील यांनीही महिला राखीव गटातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र, त्यांनी अ गटातील आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे एका गटातील माघारीनंतरही त्यांची निवडणुकीतील दावेदारी कायम असल्याने बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांसमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असले, तरी सर्व उमेदवार माघार घेणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत आणखी कोणते उमेदवार माघार घेतात आणि कोण मैदानात कायम राहतात, यावर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT