Devendra Fadnavis- Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Bank Election : CM फडणवीसांचा फोन अन् 15 जागा बिनविरोध; जयंत पाटलांनी सांगितली सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीची 'इनसाईड स्टोरी'

Jayant Patil on Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये आमदार डॉ. विश्वजित कदमांसह अमोल बाबर, महेंद्र लाड, देवराज पाटील, विराज नाईक, तानाजी पाटील, राहुल महाडिक, पृथ्वीराज पाटील, सतीश देशमुख, रणधीर नाईक, वैभव शिंदे, पूजा पाटील, वर्षा सावंत, नितीन होनराव आणि अपर्णा देशमुख यांचा समावेश आहे.

Jagdish Patil

Sangli News, 22 Oct : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत १५ संचालकांची बिनविरोध निवड झाली असून, उर्वरित सहा जागांसाठी १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सर्वपक्षीय पॅनेलमधील १९ उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर काही जागांवरील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन केला होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. या प्रस्तावाला आपण दुजोरा दिला.

त्यानंतर काल महायुतीच्या नेत्यांनाही सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.

मात्र, या प्रयत्नांनंतरही सहा जागांवरील निवडणूक टळू शकलेली नाही. त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुमनताई पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांना संचालक होण्यासाठी निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये आमदार डॉ. विश्वजित कदमांसह अमोल बाबर, महेंद्र लाड, देवराज पाटील, विराज नाईक, तानाजी पाटील, राहुल महाडिक, पृथ्वीराज पाटील, सतीश देशमुख, रणधीर नाईक, वैभव शिंदे, पूजा पाटील, वर्षा सावंत, नितीन होनराव आणि अपर्णा देशमुख यांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील बिनविरोध निवडीवरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. "विना सहकार नही उद्धार" अशा घोषणा देत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध केली. मात्र, सुकाळातील जागा बिनविरोध केल्या आणि दुष्काळी भागातील जागांवर निवडणूक लावली, अशी टीका खोत यांनी केली.

जिल्ह्यातील सग्या-सोयऱ्यांनी लोण्याचा गोळा वाटून खाल्ला आणि दुष्काळी भागातील निवडणूक मात्र कायम ठेवली, अशा शब्दांत त्यांनी बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १५ जागा बिनविरोध झाल्या असल्या, तरी उर्वरित सहा जागांवरील लढतीकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT