Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Sharadchandra Pawar : पक्ष गेला, चिन्हही गेलं, तरी 'हम साथ साथ हैं'

Sangli District NCP MLA : सांगली जिल्ह्यातील चार आमदार ठामपणे शरद पवारांसोबत

Anil Kadam

Sangli Political News :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा, असा निकाल मंगळवारी (6 फेब्रुवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो. तरीही पराभवाने खचतील ते पवार कसले. त्यांनी पुन्हा नव्याने पक्ष उभारण्याची तयारी सुरू केली आहे आणि त्याला तेवढ्याच समर्थपणे पाठिंबादेखील मिळत आहे. त्यात सांगलीतील चार आमदारांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

गेल्या वर्षी 2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक आमदारांनी अजित पवारांचा हात धरला, तर काही आमदारांनी शरद पवारांसोबत निष्ठा कायम ठेवली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची या वादाला तोंड फुटले होते. NCP Sharadchandra Pawar

अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगली जिल्ह्यात एन्ट्री केली असताना सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे चारही आमदार शरद पवारांसोबत (Sharad Pawar) ठामपणे उभे राहिले आहेत. यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील आणि पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांचा समावेश आहे. संकटाच्या काळात पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते ठामपणे त्यांच्यासोबत उभे आहेत.

खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्ह्यातील बड्या नेत्यांवर गळ टाकण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते अजित पवारांसोबत गेले आहेत. ग्रामीण भागात जिल्हाध्यक्ष वैभव पाटील वगळता मोठ्या नेत्याची साथ अजित पवारांना अद्याप मिळालेली नाही, तर महापालिका क्षेत्रात माजी महापौरांसह नगरसेवकांनी प्रवेश केल्याने जयंत पाटलांची कोंडी झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. दिवंगत आर. आर. आबा पाटील (R.R.Patil) यांच्यानंतर जयंत पाटील हे पवारसाहेबांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जयंतराव हे पवारसाहेबांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट आहे.

राष्ट्रवादीचे दुसरे आमदार मानसिंगराव नाईक (Mansing Fattesingrao Naik) हे शिराळा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्याकडे जिल्हा बँकेचे अध्यक्षपदही आहे. नाईक यांना निवडून आणण्यात प्रदेशाध्यक्ष पाटील यांची मोठी साथ मिळते. नाईक यांना मागील सत्तेच्या काळात अध्यक्षपदाने हुलकावणी दिली होती. परंतु गतवर्षी जिल्हा बँकेची निवडणूक झाल्यानंतर जयंतरावांनी त्यांना अध्यक्षपदी बसवले आहे. त्यामुळे नाईक हे शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत.

दिवंगत आर. आर. आबा पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील (Suman Patil) या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून नेतृत्व करत आहेत. पाटील घराण्याचे शरद पवार यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. आबा पाटलांच्या निधनानंतर पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध कायम राहिले.

विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पवार यांनी सुमनताईंना बळ दिले. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी वैयक्तिक लक्ष घालून सुमनताईंना दुसर्‍यांदा आमदार केले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सुमनताई या पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

पलूस-कडेगाव तालुक्यातील नेते आमदार अरुणअण्णा लाड (Arunanna Lad) हे पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. दोन्ही तालुक्यांत राष्ट्रवादीचे नेतृत्व लाड यांच्याकडे आहे. त्यांची शरद पवार यांच्याशी चांगला घरोबा आहे. डाव्या विचारसरणीचे असताना त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधून मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद उभी केली आहे. त्यामुळे अरुणअण्णा अजितदादांना साथ देणार नाहीत. सध्या जिल्ह्यातील चारही आमदारांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT