Sangli Tembu Water Politics  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Tembu Water Politics : टेंभूचे 'व्हायरल पाणी' कुणाच्या वळचणीला? मंजुरीवरून महायुतीतच श्रेयाची लढाई...

Sangli Political News : 'निधीचे श्रेय घेण्यासाठी महायुतीतीलच नेतेमंडळीमध्येच सुप्त स्पर्धा..'

Rahul Gadkar

Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत, कडेगाव, तासगाव कवठेमहांकाळ तालुके दुष्काळात होरपळत असताना पाणी मिळण्याचे कठीण झाले आहे. पाण्यासाठी टेंभू योजनेचा सुप्रमा मंजूर झाला आहे. पण पाण्याआधी लोकप्रतिनिधीमध्येच श्रेयावादाचे पाणी मुरत असल्याचे चित्र येथे दिसत आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांच्यातच श्रेय वादाची लढाई सुरू झाली आहे. या निधीचे श्रेय घेण्यासाठी महायुतीतीलच नेतेमंडळीमध्येच सुप्त स्पर्धा लागली आहे. खानापूर मतदारसंघात महायुतीतील आपापल्या परीने त्याची प्रसिद्धी सुरू केली आहे. (Latest Marathi News)

टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या खानापूर, आटपाडी व तासगाव तालुक्यातील 36 गावांना दिलासा देण्यासाठी तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेवर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. पण तत्पूर्वी महायुतीतील तीनही पक्षात 'सोशल वॉर' सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावांना पाणी मिळण्यासाठी टेंभू योजना राबविण्यात येत आहे. मात्र त्यात अनेक गावांचा समावेश नसल्याने तीन वेळा सुधारित प्रस्ताव देण्यात आला होता.

जत, कवठेमहाकाळ आणि कडेगाव तालुक्यातील छत्तीस गावांनाही पाणी मिळावे, यासाठी आमदार सुमन ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली रोहित पाटील यांनी एक दिवस आमरण उपोषण केले होते. टेंभू योजनेचे पाणी देण्यासाठी दुसऱ्या सुप्रमाची किंमत 4 हजार 88 कोटी 94 लाख रूपये होती. तर सुधारित 7 हजार 370 कोटी रुपयांच्या तिसऱ्या सुप्रमाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

प्रस्ताव मंजूर होण्याआधी भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी बुधवारीच हा प्रस्ताव गुरुवारी मंजूर होणार असल्याचे परिपत्रक काढले. गुरुवारी मंत्रिमंडळात त्याला मंजूरी मिळाल्यानंतर लगेचच आमदार अनिल बाबर यांनीही याबाबतची अशीच माहिती दिली. तर गुरुवारीच राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी त्यांचा व खासदार संजय पाटील यांचे छायाचित्र लावून टेंभू योजनेसाठी प्रयत्न केल्याबद्दल पोस्टर व्हायरल केले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT