Jayant Patil News, Sangali Latest Marathi News, Jayant Patil Latest News
Jayant Patil News, Sangali Latest Marathi News, Jayant Patil Latest News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीचा दुष्काळ संपणार; जयंत पाटलांनी ३८५८ कोटींची कामे लावली मार्गी....

सरकारनामा ब्युरो

सांगली : जलसंपदा विभागाचा मंत्री म्हणून विविध प्रकल्पांची ३८५८ कोटींची कामे सांगली जिल्ह्यासाठी प्रस्तावित केलेली आहे. या कामांना लवकरच सुरवात होईल. तसेच माझ्या हातातील अधिकाराचा वापर करून सांगली जिल्ह्यातील सर्व गावांत पाणी पोचविण्याचे काम केले असून कुठलेही गाव पाणी पोहोचत नाही, असे राहिलेले नाही. त्यामुळे जिल्ह्याची सिंचन क्षमता एक लाख १७ हजार हेक्टरची झाली आहे. गाव तेथे पाणी योजनेचा वापर होणार असून त्यामुळे जिल्हा टँकर मुक्त होईल. दुष्काळाची चिंता सांगली जिल्ह्यातील कुठल्याही गावांत राहणार नाही, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. (Sangali Latest Marathi News)

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जलसंपदा विभागाने सांगली जिल्ह्यातील गावांना पाणी देण्यासाठी काही मोठे निर्णय घेतले आहेत, त्याची माहिती त्यांनी दिली. जयंत पाटील म्हणाले, म्हैसाळ विस्तारित योजनेतून सहा टीएमसी पाणी ६४ गावांसाठी उपलब्ध केले आहे. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून ४० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे.

जत तालुक्यातील या गावांना यापूर्वी कधीही पाणी दिलेले नव्हते. आणखी एक मोठा निर्णय असा आहे की, खानापूर, तासगांव, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, सातारा जिल्ह्यातील माण, खटाव सोलापूरमधील सांगोला ही १०९ गावे योजनेच्या जवळपास होती. ही पाण्यापासून कायम स्वरूपी वंचित राहिली असती. त्यासाठी सुधारीत आठ टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले आहे. १९८ गावांतील ५० हजार क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. त्यासाठी १२०० कोटी रूपये खर्च येणार आहे. पाणी उपलब्धतेसाठी शासनाने मान्यता दिली आहे.

टेंभू विस्तारित योजनेमुळे आपल्याला सांगली जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी खानापूर, तासगांव, कवठे महांकाळ, जतची चार गावे या ठिकाणी पाणी पोहोचणार आहे. सांगली जिल्ह्यात कुठेही पाणी पोहोचले नाही, असे होणार नाही. ताकारी व म्हैसाळ योजनेच्या जुन्या वितरीकांचे ओपन कॅनॉल होते, त्याची बंदीस्त पाईपालाइन करण्याचे ठरविले आहे. यासाठी दहा हजार एकरामधील १४० गावांना बंदिस्त पाईप लाईनने पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी १८० कोटी रूपये खर्च येणार आहे. दहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

सांगली जिल्ह्याला पुराच्या पाण्याची भिती आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेत महाराष्ट्रातील सर्व पाणी आणले जाणार आहे. म्हैसाळला बॅरेज प्रकल्प होणार असून त्यासाठी दोनशे कोटी रूपये खर्च होणार आहे. अधिकचा पाणीसाठा व पुराचे पाणी अडविले जाणार आहे. त्याला आम्ही मान्यता दिली आहे. ताकारी, दुधारी योजना बचतीमधून वाळवा तालुक्यातील वंचित गावांना लाभ दिला जाणार आहे. येथील बरीचशी जमीन या प्रकल्पाखाली गेली आहे. ताकारी, दुधारी, येडेमंच्छिंद्र, किल्ले मच्छिंद्र आदी अशी मिळून ६५० हेक्टरची योजना केली आहे. मुंबईला गेल्यावर आम्ही त्यास मान्यता देणार आहोत.

कृष्णा कॅनॉल लायनिंगचे काम करण्याचा मानस असून ८६ किलोमीटरच्या कॅनालला लायनिंग केले जाईल. त्याला दोन ते तीन महिने लागतील. वाकुर्डे टप्पा दोन ३.३४ टीएमसीची असून यातून ५० हजार हेक्टर क्षेत्रफळाला पाणी उपलब्ध केले जाईल. वाळावा तालुक्यातील ३० गावांना पाणी द्यायचे ठरविले असून त्याची निविदा या महिनाभरात निघेल. वारणा धरणाच्या गळतीची दुरूस्तीसाठी ५५ ते ६० कोटींचा प्रकल्प असून त्याला एका महिन्यात प्रशासकिय मान्यता देऊन काम सुरू केले जाईल.

जलसंपदा विभागाने ३८५८ कोटींची कामे सांगली जिल्ह्यासाठी प्रस्तावित केलेली आहे. या कामांची सुरवात लवकरच होईल. सांगली जिल्ह्यातील कुठलेही गाव पाणी पोहोचत नाही, असे अभावाने होईल. पूर्वी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सात गावांत टँकर पुरवला जातो. त्यासाठीची ही सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे. विस्तारीत म्हैसाळ प्रकल्प पूर्ण होण्यास दोन वर्षे लागतील. टेंभूला विस्तारित योजनेतून पाणी उपलब्ध करून दिलेले आहे. त्यासाठी वर्षे सव्वावर्षे लागतील.

जलसंपदा मंत्री म्हणून माझ्या हातातील अधिकाराचा वापर करून सांगली जिल्ह्यातील सर्वगावांत पाणी पोचविण्याचे काम केलेले आहे. पाणी उपलब्ध केलेले आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना आम्ही केलेल्या आहेत. यातून जिल्ह्याची सिंचन क्षमता एक लाख १७ हजार हेक्टर होणार आहे. गाव तेथे पाणी योजनेचा वापर होणार असून जिल्हा टँकर मुक्त होईल. दुष्काळाची चिंता सांगली जिल्ह्यातील कुठल्याही गावांत राहणार नाही. पुराचे केवळ ०.९ टीएमसी पाणी उचलले जाणार आहे. बाकीचे पाणी आपल्याकडचेच आहे, असे त्यांनी नमुद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT