murder case Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Murder Case : राजकारणात खळबळ! शिंदेंच्या शिवसेना नेत्याला अटक; 'दुहेरी खून' खटल्यातील साक्षीदाराचे अपहरण करून केली हत्या

Eknath Shinde Shivsena Leader Arrested In Murder Case : सांगली जिल्ह्यातील दुहेरी खून खटल्यातील महत्त्वाच्या साक्षीदाराचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Aslam Shanedivan
  1. सांगली जिल्ह्यातील कोसारी दुहेरी खून प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराचे अपहरण करून खून करण्यात आला.

  2. कवठेमहांकाळ पोलिसांनी अवघ्या १४ तासांत तपास पूर्ण करून तीन संशयितांना अटक केली.

  3. अटक आरोपींमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या युवा आघाडीच्या शहरप्रमुखाचाही समावेश असल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.

Sangli News : जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका जुन्या दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी अत्यंत गतीने तपास चक्रे फिरवत मुख्य तीन संशयितांना अवघ्या १२ तासांत अटक केली. ज्ञानू अण्णाप्पा खोत (वय २५, कोगनोळी), रोहित बाळासाहेब पाटोळे (वय २५, करोली टी.) आणि हर्षद दाजी पैलवान (वय ३०, तासगाव/कवठेमहांकाळ) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

या व्यतिरिक्त सुयश ऊर्फ स्वप्नील किसन खुळे (मंगळवेढा) आणि अमर खताळ (इचलकरंजी) हे दोन संशयित सध्या पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत,अशी माहिती तपास अधिकारी निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी दिली. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिंदेंच्या शिवसेना युवा आघाडीच्या एका शहरप्रमुखाचा समावेश आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील कोसारी येथील दादासो नामदेव यमगर (वय ५०) हे जुन्या एका दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. मंगळवारी (ता. ५) सकाळी ते जात असताना, नागज फाटा येथून एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून (एमएच१३, ए यू ६६५४) आलेल्या अनोळखींनी त्यांचे अपहरण केले.

अपहरणानंतर संशयितांनी दादासो यमगर यांना कर्नाटकातील अथणीजवळील मदभावी (निलनगे वस्ती) येथील एका शेतात नेले. तिथे त्यांची हत्या करून, हा प्रकार आत्महत्या आहे, असा बनाव रचण्यासाठी मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत लटकावून दिला. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यातील गुन्हे पथकातील श्रीमंत करे यांना मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने या बनावाचा पर्दाफाश केला.

कवठेमहांकाळ पोलिसांनी तिघांना अटक केली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी, अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, उपाधीक्षक सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ ठाण्याचे निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे, सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, अमोल शिवशरण, उपनिरीक्षक वैभव पाटील, भापकर, हवालदार श्रीमंत करे, नागेश मासाळ, निवृत्ती कारंडे, अभिजित कासार, गोसावी, शीतल जाधव यांनी कारवाई केली.

नेमकं प्रकरण काय?

डिसेंबर २०२३ मध्ये शेताच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी एका गटाने केलेल्या हल्ल्यात विकास नामदेव यमगर आणि प्रशांत दादासाहेब यमगर या दोघांचा मृत्यू झाला होता. या खुनामध्ये दादासाहेब नामदेव यमगर हे मुख्य साक्षीदार होते. या सध्या या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू असून मंगळवारी याची तारीख होती. या तारखेला दादासाहेब यमगर यांचा जबाब नोंदविण्यात येणार होता. पण त्याआधीच कर्नाटकातील मदभावी येथे यमगर यांचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मिळून आला.

साक्षीदारावर दबाव आणण्यासाठी, पुरावा नष्ट करण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले होते. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयितांना जेरबंद केले आहे.
- तुषार दोशी, पोलिस अधीक्षक, सांगली

FAQs :

1. मयत व्यक्ती कोण होते?
मयत दादासो यमगर हे कोसारी येथील दुहेरी खून खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार होते.

2. त्यांचे अपहरण कधी करण्यात आले?
ते न्यायालयात जबाब देण्यासाठी जात असताना मंगळवारी त्यांचे अपहरण करण्यात आले.

3. खून कुठे करण्यात आला?
कर्नाटकातील अथणी तालुक्यातील मदभावी येथे त्यांचा निर्घृण खून करण्यात आला.

4. पोलिसांनी किती जणांना अटक केली?
कवठेमहांकाळ पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.

5. या प्रकरणात राजकीय संबंध का चर्चेत आहेत?
अटक आरोपींमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या युवा आघाडीच्या एका शहरप्रमुखाचा समावेश असल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT