Vishal Patil, Vishwajeet Kadam, Jayant Patil struggles ahead of the crucial Sangli-Miraj-Kupwad municipal election. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Election : राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं का? जयंत पाटलांशी जुळवून घ्यायचं का? विशाल पाटील, विश्वजीत कदमांना हवंय उत्तर!

Sangli Politics : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये इनकमिंगमुळे अंतर्गत नाराजी वाढली आहे, तर महाविकास आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वर्चस्व संघर्षाने उमेदवार आणि रणनीती ठरवणे कठीण झाले आहे.

Rahul Gadkar

Sangli Municipal Election : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणूक दोन्ही आघाड्यांसाठी आव्हानात्मक बनली आहे. निवडणुकीच्या तोंडावर जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्या गटाचे झालेले इनकमिंग आणि त्यातून निर्माण झालेला अंतर्गत कलह यामुळे भाजपमध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसमधील अंतर्गत वर्चस्ववादाच्या लढाईमुळे महाविकास आघाडीपुढे निवडणूक जिंकायची कशी यावर जोरदार मंथन सुरु आहे.

भाजपविरोधात कसे लढावे, कुणाला सोबत घ्यावे, पक्षचिन्हावर लढावे की आघाडी करावी, याबाबत प्रचंड गोंधळात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ताकदीच्या उमेदवारांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. 21 डिसेंबर रोजी लागणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालावर हे भवितव्य अवलंबून आहे.

सुरुवातीला जिल्हा परिषदेची निवडणूक आधी होणार अशी शक्यता होती. त्यादृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले होते. पण आरक्षणामुळे अचाकन जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडली. आता महानगरपालिकेसाठी कमी वेळात उमेदवार शोधणे, संघटन बांधणी करणे, मतदारांपर्यंत पोहोचणे हे सर्वच पक्षांसाठी आव्हान असणार आहे. त्या तुलनेत भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी सध्या तयारीच्या पातळीवर आघाडी घेतली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या गोठात अद्याप हालचाल नाही.

भाजपमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी पदे नेमली. शेखर इनामदार यांच्यासह निवडणूक प्रमुखपद दिले. मात्र जयश्रीताई पाटील गट सोबत घेतल्याने अंतर्गत नाराजी फोफावली आहे. काँग्रेसला मात्र अजून सूरच गवसला नसल्याचे चित्र आहे. पृथ्वीराज पाटलांनंतर सांगली शहर-जिल्हाध्यक्ष पदावरील निवडी लांबणीवर पडल्या आहेत. राजेश नाईक की मंगेश चव्हाण, हा गोंधळ पुन्हा सुरू झाला आहे. आता आठवडाभरात त्यावर शिक्कामोर्तब करावे लागणार आहे. राष्ट्रवादीला सोबत घ्यायचे की काँग्रेस म्हणून स्वतंत्र निवडणूक लढवायची नेत्यांना साशंकता आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कठीण परीक्षा

भाजपसमोर (BJP) सर्वांत मोठा आव्हान असणार आहे, पक्षांतर्गत जागा वाटपाचे. पक्षाचे मूळ कसलेले, जुने कार्यकर्ते शड्डू ठोकून तयार आहेत. त्यात जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्या प्रवेशानंतर गर्दी वाढली आहे. महायुतीतीत घटकपक्षांच्या अपेक्षा अधिक आहेत. या सर्व स्थितीत मार्ग काढण्याचे खरे आव्हान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर असणार आहे. त्यांनी काही आकडे मांडले आहेत, ते कितपत पचनी पडतात, हे लवकरच कळेल.

जयंतरावांशी जुळणार?

महाविकास आघाडी करायची का? आमदार जयंत पाटील यांच्यासोबत जायचे का? या प्रश्नावरून खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्यात एकमत होताना दिसत नाही. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत मात्र या तीनही नेत्यांनी समझोता केला. किमान 'हात' विरुद्ध 'तुतारी' अशी लढत होणार नाही, याची खबरदारी घेतली. त्याचा किती परिणाम झाला आहे, हे 21 डिसेंबरला कळेल. पुढे तोच फॉर्म्युला इथे वापरायचा की थेट आघाडी करायची, यावर चर्चा होऊ शकते. मतविभाजन टाळण्यावर विरोधकांचे एकमत होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT